Showing posts with label birthday. Show all posts
Showing posts with label birthday. Show all posts

Thursday, 11 May 2017

Dear Aniruddha

प्रिय हनी ,

जन्मदिनी तव स्मरते मजला, बालपणीचे तुझे रूप गोजिरे,
आज जरी जन्म दिन तिसावा, बालपणच मज तुझे आठवे..

रंगपंचमीचा जन्म तुझा, बालकृष्णच जणू तू माझा,
घेऊन रूप माझेच मूर्त तू , आलास घरी  शोनुल्या माझ्या...

दिसा मासा वाढता वय तुझे,गुणही तुझे दिसू लागले,
चित्रकलेतील तुझी पावले , घरी दारी उमटू लागली....

शांत असे तुझा स्वभाव जरी, खट्याळपणा असे ताव अंतरी,
आज असशी दूरवरी , रमलास ताव नाव जीवनी...

अशीच व्हावी तुझी प्रगती, घेत राहा तू ऊंच भरारी,
नाव लौकिक प्राप्त होऊनि, लेले कुला ते उध्दारी ..... 

Priya sakhi Deepti

प्रिय सखी 

सौ. दीप्ती ,

सुंदर सकाळ आजची ,तुझ्या जन्म दिनाची ,
 मंगल  दिनी स्मरावी , थोरवी जन्म दात्यांची .. 

लक्ष लक्ष प्रणाम त्यांना , गुणी लेक तू त्यांची ,
कारकीर्द घडवूनी जगी, उंचावलीस  तू  प्रतिमा त्यांची .... 

आशीर्वाद त्यांचे सदैव असतील पाठीशी,
आठवणीने मन येई भरुनी , नत मस्तक आज दिशी... 

प्रेमळ ते बहीण भाऊ , माया अपार तुजवरी... 
शुभ चिंतना तंव आली धावुनी , वास्तव्य स्वातीचे परदेशी जरी... 

रत्नांपरी गुणी लेकी तुझ्या , अलंकार बुद्धीचे ताव लेवुनी,
सार्थक करिती आयुष्याचे , जगी कीर्ती संपादुनी.... 

आयुष्यभराची साथ तुजला , दिलीप सम जोडीदाराची मिळाली,
समृद्ध झाले मग जीवन , उणीव काहीच ना उरली... 

सखी रूपाने भेटलीस , मला तू जीवनी ,
बंध नात्यांचे ही जुळले, नसता काही ध्यानी मनी .... 

आज षष्ठी तुझी , लक्ष लक्ष शुभेच्छा तुला,
वांच्छिलें जे जे ते , सर्व लाभो तुला..... 

अशीच मैत्री तुझी वर्षानुवर्षे लाभो मला,
ईश्वराकडे एकच मागणे ,
आरोग्य , दीर्घायुष्य लाभो तुला..... 


Saturday, 30 November 2013

आजीचा ( शांताबाई साठे ) शंभरावा जन्मदिन


आला दिन हा सौख्याचा , लक्ष लक्ष दीप उजळू दे .
सुमनांच्या लावा माळा , सुवास तो आसमंती भरू दे ,

आठवणींच्या हिंदोळ्यावर ,स्वर होऊनी मन ते झुलू दे ,
वाडा आपुला साक्षीला , सोहळा हा कौतुके पाहू दे ,

साजरे झाले आनंदपर्व , वाड्याने सर्व ते पहिले ,
क्षण काही दुःखाचे पण , आले नि रडवूनी गेले ,

आज तुझ्या भोवतीने, फेर धरिती लेकुरे ,
बालपण आठवते आमुचे , वाटते व्हावे पुनः लहानगे ,

सांगाव्यास तू कहाण्या , तिन्हीसांजेला बसुनी अंगणामध्ये ,
आम्हीही त्या ऐकाव्या , होऊनी तन्मय झोक्यासंगे ,

न्हाउनी निघाले असेल ,मन ते  आठवणींने तुझे ,
तुज कडून ऐकण्यास त्या , मन आमुचे हि आसुसले ,

शतदीपांची ती दीपमाळ  , सदैव अशीच तेवू दे ,
मांगल्य फुलांच्या सुवासाने , वाडा तो घमघमू दे ,

असेच सण , अशीच दिवाळी , साजरी होवो  वर्षानुवर्षे ,
प्रेमळ तुझा तो हात , आमुच्या शिरी असाच राहू दे.

अल्पना लेले
नोव्हेंबर २०१३

Sunday, 18 November 2012

गौरवपत्र

परम पूज्य मातोश्री शांताबाई साठे यांना
।। गौरवपत्र ।।
कार्तिक शु. ५, शके १९३४
दि. १८ नोव्हेंबर २०१२


प्रिय आजीस,

शुभ दिन हा आज उगवला, हर्ष आसमंती पसरे
जन्म दिवस तव भाग्याचा, शंभरावा म्हणोनी ठरे || १ ||

      शुभ चिंतनी तव मायेने, परिवार सकल हा मग्न असे
      परीजनही अभिनंदन करिती; समस्त साठे पैवाराचे || २ ||

साठे कुलाची तू लक्षुमी, टिळक कुलाची सुकन्या तू
उभय कुल ते झाले धन्य, नाते तयांचे गुंफीलेस तू || ३ ||

      पुत्र, स्नुषा, कन्या, जामात, परिवार तुझा हा विस्तृत असे
      पौत्र, प्रपौत्र, असा कबिला सेवेसी तव सज्ज असे || ४ ||

प्रेममयी माता असशी तू, वात्सल्यमयी तू प्रमाता,
पुत्र, पौत्र वंदितात तुजला, आणि प्रपौत्र हि आता || ५ ||

      काकू, मावशी, कुणी म्हणती, भगिनी, नणंद कुणाची तू
      सासू असुने प्रेमाने तव, स्नुषाना पण जिंकिलेस तू || ६ ||

अन्नपूर्णा तू, गुरुप्रत्याक्षी, गृहकृत्यांचे त्वयि दिली धडे
कला, खेळ अन गप्पानाही, गोष्टीमध्ये रंग चढे || ७ ||

      स्मृती असुनी तीक्ष्ण तुझी, बुद्धी हि तव प्रगल्भ असे
      वाचनाची हि गोडी तुजला, लेखनी परि तव चित्त रमे || ८ ||


पारीघ मोठा तव सीमेचा, सात समुद्र ते ओलांडीले तुये 
ज्ञानात नित्य रमता गमता, व्यक्तिमत्व अजुनी उजळे ।। ९ ।।

      धैर्यवती तू, संकटात हि दर्शविलेस नित स्थैर्य तुझे,
      परिवाराची धुरा तूच तू, शांता नाव हि सार्थ ठरे ।। १० ।।

प्रेमळ हा सहवास तुझा, अनमोल असे आम्हा ठेवा
राहो मस्तकी सदैव अमुच्या, आशीर्वचनी हात तुझा ।। ११ ।।

      नाव कुणी काढिता तुझे ग, अभिमानाने मम ऊर भरे 
      आजी तशी आम्हा लाभली, जगी कुणा लाभे का रे? ।। १२ ।।

सोहळा हा देखिला स्वनयनाने, भाग्य हे आमुचे थोर खरे
जन्म दिवस हा भाग्याचा, आनंददायी सदैव म्हणोनी ठरे ।। १३ ।।

      शतकाच्या तव जन्मदिनी या, एक मागणे त्या ईशचरणी
      सदैव लाहो समाधान तुज, आनंद मिळो क्षणोक्षणी ।। १४ ।।

               समस्त तुझी लेकुरे


(शब्दांकन)
अल्पना लेले