Sunday 18 November 2012

गौरवपत्र

परम पूज्य मातोश्री शांताबाई साठे यांना
।। गौरवपत्र ।।
कार्तिक शु. ५, शके १९३४
दि. १८ नोव्हेंबर २०१२


प्रिय आजीस,

शुभ दिन हा आज उगवला, हर्ष आसमंती पसरे
जन्म दिवस तव भाग्याचा, शंभरावा म्हणोनी ठरे || १ ||

      शुभ चिंतनी तव मायेने, परिवार सकल हा मग्न असे
      परीजनही अभिनंदन करिती; समस्त साठे पैवाराचे || २ ||

साठे कुलाची तू लक्षुमी, टिळक कुलाची सुकन्या तू
उभय कुल ते झाले धन्य, नाते तयांचे गुंफीलेस तू || ३ ||

      पुत्र, स्नुषा, कन्या, जामात, परिवार तुझा हा विस्तृत असे
      पौत्र, प्रपौत्र, असा कबिला सेवेसी तव सज्ज असे || ४ ||

प्रेममयी माता असशी तू, वात्सल्यमयी तू प्रमाता,
पुत्र, पौत्र वंदितात तुजला, आणि प्रपौत्र हि आता || ५ ||

      काकू, मावशी, कुणी म्हणती, भगिनी, नणंद कुणाची तू
      सासू असुने प्रेमाने तव, स्नुषाना पण जिंकिलेस तू || ६ ||

अन्नपूर्णा तू, गुरुप्रत्याक्षी, गृहकृत्यांचे त्वयि दिली धडे
कला, खेळ अन गप्पानाही, गोष्टीमध्ये रंग चढे || ७ ||

      स्मृती असुनी तीक्ष्ण तुझी, बुद्धी हि तव प्रगल्भ असे
      वाचनाची हि गोडी तुजला, लेखनी परि तव चित्त रमे || ८ ||


पारीघ मोठा तव सीमेचा, सात समुद्र ते ओलांडीले तुये 
ज्ञानात नित्य रमता गमता, व्यक्तिमत्व अजुनी उजळे ।। ९ ।।

      धैर्यवती तू, संकटात हि दर्शविलेस नित स्थैर्य तुझे,
      परिवाराची धुरा तूच तू, शांता नाव हि सार्थ ठरे ।। १० ।।

प्रेमळ हा सहवास तुझा, अनमोल असे आम्हा ठेवा
राहो मस्तकी सदैव अमुच्या, आशीर्वचनी हात तुझा ।। ११ ।।

      नाव कुणी काढिता तुझे ग, अभिमानाने मम ऊर भरे 
      आजी तशी आम्हा लाभली, जगी कुणा लाभे का रे? ।। १२ ।।

सोहळा हा देखिला स्वनयनाने, भाग्य हे आमुचे थोर खरे
जन्म दिवस हा भाग्याचा, आनंददायी सदैव म्हणोनी ठरे ।। १३ ।।

      शतकाच्या तव जन्मदिनी या, एक मागणे त्या ईशचरणी
      सदैव लाहो समाधान तुज, आनंद मिळो क्षणोक्षणी ।। १४ ।।

               समस्त तुझी लेकुरे


(शब्दांकन)
अल्पना लेले