Thursday 30 April 2015

सूर....Soor...

सूर

पावसाच्या माऱ्यातून छत्री सांभाळत शालिनी लगबगीने सभागृहाच्या पार्किंग लॉट मधील आपल्या गाडीकडे वळली. पांडुरंग, तिचा ड्राईवर तत्परतेने उतरला व त्याने मालकिणीसाठी मोठ्या अदबीने गाडीचे दार उघडून धरले. शालिनीने छत्री बंद केली व पावसाचा मारा चुकवत ती गाडीत शिरली. सिल्कची कांजीवरम भिजायची ती भिजलीच. शालिनीने साडी झटकत ठाकठीक केली. पर्समधून रुमाल काढून तिने चेहरा व केसावरचे पाणी टिपून घेतले. ड्रायवरने गाडी सुरु केली ताशी हलका हिसका बसून तिची मान मागे रेलली. तिने मान तशीच ठेवली व डोळे मिटून घेतले.कार्यक्रम फारच छान झाला होता. तिच्या मनात अजूनही भैरवीचे सूर घोळत होते. चीजही तिच्या ओळखीची आवडीची होती. अनेक वर्षापूर्वी बुवांनी शिकवलेली. इतकी वर्षे झाली पण अजूनही जशीच्या तशी आठवते आहे. आठवणारच, बुवा प्रत्येक राग, त्याची चीज अगदी घोटून घेत. काय बिशाद एखादा सूर इकडचा तिकडे होईल..खरं तर विभाकरलाही संगीताची अतिशय आवड. पण त्याला संगीताविषयी अशी तळमळ नाही वाटत. शालिनी मात्र संगीताची मैफिल सहसा चुकवत नाही आणि आज तर तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीची मैफिल मग तर शालीनीची हजेरी या मैफिलीला लागायचीच. नंदिनी – तिची बालपणीची मैत्रीण. पण आता इतकी वेगळी भासली. आता ती एक पट्टीची गायिका आहे. शालिनी तिच्यात आपली बालमैत्रीण शोधतच राहिली. खर तर शालिनीने नंदिनी विषयी बरच काही ऐकलं होत. तिची गायनाची विशिष्ट शैली, तिचे सुरांवरील प्रभुत्व, तिला मिळालेले पुरस्कार, पदव्या, अधून मधून पेपरला तिची बातमी झळकायचीच. खर खूप खूप पूर्वीपासून नंदिनीला प्रत्यक्ष भेटावेसे वाटत आहे पण काही ना काही कारणाने
राहतच गेलं. खरच का काही कारण होत? छे काहीच कारण नव्हत. मग का बर लांब राहिली ती नंदिनीपासून?
शालिनीने खिडकीबाहेर पहिले. ट्राफिकच्या समुद्रात तिची गाडी हेलकावे खात होती. तिने घड्याळ बघितले, दहा वाजून गेले होते. या ट्राफिकमध्ये आणखी एक तास तर नक्कीच लागणार असा विचार करून तिने पुनः मान मागे रेलली आणि डोळे मिटून घेतले. बाहेर पावसाचा जोर वाढतच चालला होता. पावसाच्या तालावर तिच्या मनाचे तारू भरकटत भरकटत बालपणीच्या आठवणीत जाऊन पोचले. आज नाहीतरी नंदिनीच्या मैफिलीने तिला तिच्या पूर्वायुष्यात नेले होतेच. त्यामुळे आता तिला आपल्या मनाला आवर घालणे अगदी अशक्य होऊन बसले.ती तेव्हा आजची प्रौढा, साडीतली शालिनी नव्हती. ती होती एक परकरी पोर. मुक्त, मुग्ध बालिका. सर्व चिंता, विवंचनापासून लांब आपल्याच रम्य विश्वात रमणारी तिच्या अण्णांची लाडकी शालू. तीन भावंडात सर्वात धाकटी. दोन्ही मोठ्या भावांच्या पाठीवर झालेली आणि म्हणूनच घरात सगळ्यांच्या गळ्यातील ताईत. शालिनीला, गावातील घरात, अंगणातून सोप्यात, माजघरातून स्वैपाकघरात वारा प्यायलेल्या वासाराप्रमाणे धावणारी बागडणारी शालू दिसू लागली. किती सुंदर दिवस होते ते. दिवसभर हुंदडणे एव्हढेच काय ते ठाऊक होते लहानग्या शालूला. शाळा सुटली कि शालू आणि तिची मैत्रीण नंदिनी खेळत. कधी हिच्या घरी भातुकली तर कधी तिच्या घरी, सागरगोटे, लगोर असे खेळ रंगत.. अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्या. एक क्षणभरही त्यांना एकमेकिंशिवाय चैन पडत नसे. नंदिनीच्या घराशेजारीच मधु.. हो मधुच, मधुकर नावाचा एक मुलगा राहात असे. कॉलेजात जाणारा मधु नंदिनिवर जीव लावून बसला आहे हे शालूच्या नेमकं लक्षात आल होत.
सतत तिच्या वाटेवर तो डोळे लावून बसलेला असे. त्याच्यावरून ती नंदिनीला सतत चिडवत असे. नंदिनिलाही तो आवडत असे. १४-१५ वर्षाच कोवळ वय ते. स्वप्न बघण्याचं. त्यांची डोळ्यातल्या डोळ्यात होणारी भावनिक देवाण घेवाण शालीनिच्याही परिचयाची झाली होती. मधु आणि नंदिनीची गाठ घालून देण्याचं कामही शालूनच केल. शाळेच्या मागे दुपारच्या टळटळीत उन्हात त्या प्रेमिकांची गाठ घालून देताना किती मोठा पराक्रम केल्यासारखं वाटत होत तिला. त्यावेळी वाटलेली तो भीती, ती हुरहूर सगळच अवर्णनीय होत. त्यांच्या फुलणाऱ्या प्रीतीची ती एकमेव साक्षीदार होती. तो काळ आता कसा स्वप्नवत वाटतोय. इतक्या वर्षानंतर आज नंदिनीला पाहिलं. तिचं लग्न मधुशी झालं कि नाही, किती प्रश्न पडले होते शालिनीला.
आपण संगीत कशा शिकू लागलो बर? हो आता आठवतंय. तो दिवस कसा विसरता येईल बर? त्या दिवशी नंदिनीच्या घरी झोपाळ्यावर बसून दोघी भेंड्या लावत होत्या. तेव्हा नंदिनीच्या घरी आलेल्या गाणाऱ्या बुवांनी त्यांचे गाणे ऐकले व त्यांच्या गळ्यातील सूर ओळखला. त्या बुवांनी नंदिनीला स्वतः संगीत शिकवण्याची तयारी दाखवली. झालं दुसर्या दिवसापासून नंदिनीच्या शास्त्रोक्त संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. जे करायचे ते दोघींनी एकत्र, त्यामुळे  नंदिनी बरोबरच शालीनिलाही संगीताचे धडे घेण्याची इच्छा झाली. घरून आधी जरासा विरोध झाला पण शालिनीचा हट्ट पाहून अण्णांनी परवानगी देऊन टाकली. संगीताचे शिक्षण सुरु झाले तसे शालिनीच्या आवाजाची जादू बुवांनी ओळखली. नंदिनी  पेक्षा शालिनीच संगीतात मोठे नाव काढेल असे ते वारंवार म्हणत. अण्णांनी ही गोष्ट कधी फारशी मनावर घेतली नाही आणि त्यांचे संगीताचे शिक्षण सुरळीतपणे चालत राहिले. दोन्ही शिष्यांनी संगीतात प्रगती केली. संगीत शिकता शिकताच दोघी लहानाच्या मोठ्या झाल्या. आता त्यांची संगीतात इतकी प्रगती झाली होती कि एक दिवस बुवांनी दोघींना आपल्याबरोबर मैफिलीत साथ करावयास न्यायचे ठरवले. हे ऐकताच दोघी आनंदाने नाचायच्या तेव्हढ्या राहिल्या होत्या.
मात्र हे शालिनीच्या घरी कळण्याचा अवकाश, घरी अगदी गहजबच झाला. अण्णांची तिच्या गाण शिकण्याला हरकत नव्हती पण मैफिलीत गाण हे त्यांना कबूल नव्हत.बुवांनी पण परोपरीने सांगितले, शेवटी अण्णांनी त्यांचा निर्णय बदलला. अखेर बुवांबरोबर साथीला दोघी गेल्या. बुवांच्या साथीला गेलेल्या या दोघींची तयारी पाहून अनेक मोठ-मोठ्या कलाकारांनी त्यांचे कौतुक केले. हे पाहून अण्णांचा राग विरघळला व त्यांनी दोघींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आता बुवांबरोबर त्या दोघी साथीला जाऊ लागल्या. त्यांची मेहनत फळाला येऊ लागली. अशाच एका कार्यक्रमात शालीनीची भेट विभाकारशी झाली. विभाकर एक उच्चविद्याविभूषित कुलीन घरातील तरूण होता. शास्त्रीय संगीतात त्याला रस होता. दोघांनी एकमेकाला पहिल्या भेटीतच पसंत केले. हळू-हळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली व त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. घरीही तो सर्वांच्या पसंतीस उतरला आणि एका शुभ मुहूर्तावर थाटामाटात त्यांचे लग्न पार पडले. त्याच सुमारास नंदिनी व मधुकरही आपल्या प्रेमाचे गुपित घरी सांगणार होते पण शालिनीला विभाकरापुढे कोणत्याच गोष्टीची शुद्ध नव्हती. आपल्या लग्नाची तयारी, खरेदी, नातेवैकांकडे होणारी केळवण यांत नंदिनीला, आपल्या मैत्रिणीला ती कशी काय विसरली? आपल्या लग्नाला नंदिनी आली तरी होती कि नाही हेही तिला आठवेना. असं कसं झालं?
विभाकरशी लग्न झाल्यावर तिचा सर्व वेळ विभाकरमय होऊन गेला. ती संसारात अगदी रमून गेली. आता तिला रीयाजाला वेळही मिळेना. तिचे गाण्याचे कार्यक्रम कमी कमी होऊ लागले. आता तर तिला नंदिनीची आठवणही येईनाशी झाली. यथावकाश तिला मुल-बाळ झाली. विभाकराच्या व्याव्सायापायी काही काळ परदेशात वास्तव्यही झालं, मग काय नव्या दुनियेत संगीताशी जुळलेला संबंद्ध तुटतच गेला. मात्र आज नंदिनीला मैफिलीत गाताना पाहून आत हृदयात कुठेतरी बारीक काळ उठलीच. आज नंदिनिप्रमाणेच ती ही प्रथितयश गायिका असती नक्कीच. खर तर नंदिनिपेक्षा ती काकणभर सरस गात असे असं बुवा म्हणत. खरच तिचं चुकलंच. संगीतापासून दूर होऊन केव्हढी मोठी चूक केली. आज आपलही मोठ नाव झालं असत. छे.
या अशाच विचारांनी शालिनीच मन विषण्ण झालं. राहून राहून तिच्या डोळ्यासमोर नंदिनी येत होती.
व्यासपीठावर साथीदारांबरोबर स्थानापन्न झालेली प्रतिष्ठित गायिका नंदिनी. आजची प्रतिभासंपन्न गानसरस्वती. काय रुबाब होता तिचा. किती मान सम्मान. किती किती पदव्यांनी तिला आज सम्मानित केले जात होते. हे सगळ आपल्यालाही मिळालं असत.
दोन दिवसापूर्वी जेव्हा नंदिनीच्या मैफिलीची जाहिरात वाचली तेव्हा खर तर आपल्या जुन्या मैत्रिणीला भेटण्याच्या ओढीने शालिनी या कार्यक्रमाला गेली होती. गाण सुरु झालं आणि तिच्या मनात या विचारांनी गर्दी केली. मैत्रीची ओढ अनामिक अशा असुयेत कधी बदलली ते तीच तिला कळले ही नाही. इतकं कि नंदिनीला न भेटताच ती तिथून निघाली. आता ही गोष्ट तिच्या लक्षात आली व तिला स्वतःचीच लाज वाटली. आपल्या एकेकाळच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचा आपल्याला मत्सर वाटावा? शी शी, काय हे? विभाकराना कळल तर आपण त्यांच्या नजरेतून उतरू ही बोच तिचे मन कुरतडू लागली. त्यांना आपलं हे वागण कधीच आवडणार नाही . त्यांनी कधीही आपल्या गाण्याला विरोध केला नाही उलट आपण पुनः नव्याने सुरुवात करावी असच ते नेहमी म्हणत असतात मग नंदिनीचा हेवा करण्याचं आपल्याला कारणच काय? आपण जे गमावलं त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. तिने ठरवले आता उद्या मात्र नंदिनीला फोन करायलाच हवा. कदाचित ती आपल्याकडे आल्यावर तिच्या मोठ्या नावाचा तोरा मिरवेल पण तरीसुद्धा मला तिला भेटायलाच हवं. तिच्या मान-सन्मानाला साजेसा पाहुणचार करायलाच हवा.अचानक गाडी थांबल्याचे तिला जाणवले व तिने डोळे उघडले. ती घरी पोचली होती. घरी विभाकर ही नव्हता व तिची मुल, सुना, नातवंड ही. हो खरच, ती सर्व मंडळी दोन दिवस सहलीसाठी गेलेली होती. उद्या यायची ती परत. आणि विभाकरही. कामानिमित्त बाहेरगावी गेला आहे तो. जमलं तर येतो म्हणाला होता, नाहीच जमलेलं दिसत.गेले दोन दिवस एकटीच होती ती घरात. तिचा वॉश घेऊन होईतो स्वैपाकीण बाईंनी तिचे पान घेतले होते. एकटीने जेवायचे तिच्या जीवावर आले होते पण अन्नाचा अपमान करू नये म्हणून तिने चार घास खाऊन घेतले.जेवण झाल्यावर शालिनी बंगल्याच्या भल्या मोठ्या हॉलमध्ये येऊन कोचावर बसली. किती मेहनत घेतली होती तिने तो सजवायला. उंची फर्निचर, मॅचिंग पडदे, मोठा महागडा टी.व्ही., उत्कृष्ट प्रतीचा गालीचा व या सर्वाला साजेशी रंग संगती. जो तो तिच्या सिलेक्शनचे कौतुक करी. शालिनी डोळे भरून आपल्या वैभवाकडे पहात राहिली. पण अचानक तिला ती सजावट, ते वैभव अपुरे वाटू लागले. खरच तिथे त्या खिडकीशी एक तंबोरा आणि बैठक असायला हवी होती.
आपण आपल्या आयुष्यातून संगीताला इतकं हद्दपार कसं करू शकलो? संगीताशी आपले नाते इतके का तकलादू होते? तिला विचार करवेना.अपराधीपणाच्या भावनेने तिचे मन भरून गेले. घड्याळाने बाराचे तोळे दिले ताशी आता झोपावे असा विचार करून ती आपल्या अद्द्ययावत बेडरूम मध्ये आली. डनलॉप च्या मउ गादीवरही तिची तळमळ कमी होइना. विचार करता करता कधीतरी तिचा डोळा लागला. झोपेतही तिला तिचा तंबोरा, बुवा, नंदिनी यांचीच अस्वस्थ करणारी स्वप्न पडत होती. उद्विग्न मनस्थितीतच तिला जग आली. सकाळी उठल्याबरोबर शालिनीने पहिलं काम काय केल तर नंदिनीचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि तिला फोन लावला. तिचा आवाज ऐकून नंदिनीला खूप आनंद झालेला दिसला व तिने कसलेही आढे वेढे न घेता तिच्याकडे यायचं कबूल केलं.आता शालीनीची अगदी धांदल उडाली. आज आता घरातली सर्व मंडळीही परत यायची आणि ही नंदिनिसुद्धा. तिच्यासाठी खास बेत करायला हवा. तिने स्वैपाकीण बाईंना ढीगभर सूचना दिल्या. विभाकर, मुल, सुना, नातवंड आणि नंदिनी सर्वांच्या आवडी निवडी लक्षात घ्यायला हव्या होत्या ना. आधीच व्यवस्थित टापटीप असलेल घर तिने मोलकरणीकडून लख्ख करून घेतलं. फ्लॉवरपॉट मध्ये ताजी फुलं आणून सजवली. नवे पडदे, कुशन कव्हर्स.  काय करू आणि किती करू असं झालं तिला. सगळी तयारी मनासारखी झाल्याची खात्री पटल्यावर ती स्वतः अंघोळ वगैरे आटपून तयार झाली. किरमिजी रंगाची तलम इंदुरी साडी ती नेसली. त्यावर मॅचिंग माणकांचा सेट, नेकलेस, कुड्या, अंगठी आणि बांगड्या. एव्हढेच काय मंगळसूत्रही माणकांच्या खड्याच्या पेन्डंटच. ती स्वतःच्या तयारीवर खुश झाली. तिला लहानपणापासुनच मॅचिंगची भारी आवड. रिबिनी देखील फ्रॉकला मॅचिंग असत तिच्या. त्याविरुद्ध होती नंदिनी. पण ते
बालपणाबरोबर सरल असणार. आताची नंदिनी ताशी कशी असेल? काल कार्यक्रमात पाहिलं ना. पांढरी जरीकाठी बनारसी साडीवर सगळा हिऱ्यांचा सेट छान शोभून दिसत होता. आता ती कशी बोलेल, कशी वागेल ह्याचच शालिनीला कुतूहल होत. मोठेपणाचा तोरा तर नाही ना मिरवणार?
बघता बघता साडे दहा वाजले आणि दारावरची बेल वाजली. कबूल केलेल्या वेळेवर नंदिनी शालिनीच्या दारात हजर झाली. तिला दारात पाहताच शालिनीला तिचे स्वागत कसे करावे हेच कळेना. ती एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभीच राहिली. पण लगेच तिने स्वतःला सावरले. नंदिनीने पुढे केलेला निशिगंधाचा गुच्छ घेतलं आणि नंदिनीला कडकडून मिठी मारली. दोघींनाही गहिवरून आले. दोघी एकमेकींकडे भरल्या डोळ्यांनी बघत बसल्या. मोलकरणीने पाणी आणून ठेवल्यावर दोघी भानावर आल्या. क्षणार्धात वयाचा अडसर बाजूला झाला आणि दोघी दोन लहान मुली झाल्या. अचानक प्रौढत्वाचा मुखवटा गळून पडला आणि किशोर वयातील बाल सुलभ चिवचिवाट सुरु झाला. एकमेकींना किती जाड  झालीस, किती म्हातारी दिसतेस असं चिडवत त्या दोघी जुन्या आठवणीत काळाचे भान विसरल्या. बाईंच्या ह्या स्वभावाशी अनभिद्न्य असलेल्या स्वैपाकीणबाई त्या दोघींच्या पुढ्यात नाश्ता ठेवताना आश्चर्याने बघतच राहिल्या. तेव्हा शालिनीने मोठ्या अभिमानाने ही माझी बालमैत्रीण असे सांगितले. दोघी तासभर जुन्या आठवणी काढून हसत होत्या, रडत होत्या. दोघींनाही एकमेकीविषयी सारखीच तळमळ वाटत होती. मधल्या काळात काय काय घडलं हे सगळं त्यांना एकमेकींना सांगायचं होत. विचारायचं होत पण अखंड बडबडीत क्रम लागत नव्हता. एका विषयावर बोलता बोलता गाडी
अचानक भलत्याच विषयावर घसरत होती.
इतक्यात विभाकरचा फोन आला, जेवायला घरी पोचतोय. म्हटल्यावर दोघी वर्तमानात आल्या. शालिनीचे चित्त आता घराकडे वळले. नंदिनीला तिने अगत्याने फिरून संपूर्ण बंगला दाखवला. तिची स्वतःची बेडरूम, मुलं-सुनांच्या बेडरूम्स, नातवंडांच्या रूम्स, पुढची-मागची गॅलरी, वरची टेरेस, तिने स्वतः जोपासलेली आवडीने लावलेली बाग दाखवली. तिचे अत्याधुनिक किचन, शोभिवंत ड्रॉइंगरूम सर्व काही नंदिनीने कौतुकाने पहिले.
जेवणाची वेळ होईतो विभाकर ही घरी पोचले. लांबच्या प्रवासातून आले असले तरी त्यांनी दोघींची आस्थेने चौकशी केली. बायकोवरच प्रेम तर त्यांच्या प्रत्येक अविर्भावातून नंदिनीला जाणवत राहिलं. जेवतानाही ते त्यांच्या गप्पांमधे भाग घेत होते. शालिनीच्या बरोबरीने नंदिनीला आग्रह करत होते. एक आदर्श प्रेमळ जोडपं म्हणून तिलाही त्याचं फार कौतुक वाटलं व ते तिच्या चेहऱ्यावर दिसत होत.
जेवण झाल्यावर दोघींचा निरोप घेऊन विभाकर ऑफीसला निघून गेले. आणि या दोघी शालिनीच्या खोलीत विश्रांतीसाठी गेल्या. थोडी झोप काढावी हा हेतू. पण गप्पांना पुनः नव्याने सुरुवात झाली. बोलता बोलता शालिनीने नंदिनीच्या लग्नाचा विषय काढला. मधूची चवकशी केली. यावर नंदिनी जराशी गंभीर झाली व म्हणाली संगीताची साधना करता करता कसलं प्रेम आणि कसलं लग्न? संगीतात रमलेल्या नंदिनीला मधूच्या घरच्यांनी नापसंत  केल. त्यांची अट होती लग्नानंतर मैफिलीला कायमचा रामराम ठोकला तरच हे लग्न शक्य होत. मधुकरही ह्यावर मुग गिळून बसला. त्याच्या अशा वागण्याने दुखावलेल्या नंदिनीने स्वतःच लग्नाला ठाम नकार दिला. आणि तेव्हा पासून आजतागायत संगीत साधना करत राहिली.
आई-वडिलांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचे मन मधूच्या गप्प राहण्याने दुखावले होते. त्यानेही तिचे मन न ओळखल्याची ती व्यथा होती. तिने लग्न न करता संपूर्ण आयुष्य संगीत साधनेसाठी वाहून टाकण्याचा निश्चय केला होता. आणि तसं तिने करूनही दाखवलं. संगीताच्या क्षेत्रात तिने मिळवलेलं नाव, यश, समृद्धी यातच ती आजवर सुखी आणि समाधानी होती. पण आज शालिनीचा सुखाचा संसार बघितल्यावर तिला प्रकर्षाने आपण कोणत्या सुखाला पारखे झालो याची जाणीव झाली. आज शालिनीजवळ तिची स्वतःची जीवाला जीव देणारी मुल-बाळ, नवरा आहे पण नंदिनी आज अगदी एकटी आहे. ४-५ वर्षापूर्वी तिचे वडील व पाठोपाठ आई गेल्यावर भावाच घरही तिला परक झालं. त्याच्या संसारात आपली लुडबुड नको म्हणून तिने स्वतःच वेगळ बिर्हाड केलं. पण बाहेरून प्रवासातून थकून भागून तिथे जाताना ओढ वाटेल असं कोण होत तिची वाट बघणार? तिची आस्थेने चवकशी करणारं? तिथला भकास एकटेपणा अगदी नकोसा होतो. हे आणि असं बरंच काही नंदिनी सांगत राहिली आणि वातावरणातल चैतन्यच हरवलं. दोघी अंतरमुख होऊन आपापल्या आयुष्याचा आढावा घेत राहिल्या. शेवटी दैव बलवत्तर असत हेच खरं. मनातल्या मनात दोघीही आपापल्या नशिबाचा विचार करीत राहिल्या. असा किती वेळ गेला कळलचं नाही.
शालिनीने तिच्याजवळ आपण संगीताची साधना करू न शकल्याची खंत व्यक्त केली तेव्हा नंदिनीने तिला त्याबद्दल खंत न करता आताही हातात वेळ आहे तेव्हा संगीत साधना करता येण्यासारखी आहे असा सल्ला दिला. जगात नाव मिळवणे हे एका मर्यादे पर्यंत ठीक आहे परंतु आयुष्यात एक जीवाला जीव देणारा जोडीदार हवा जो तुला मिळाला आहे त्या बद्दल तू देवाचे आभार मानायला हवेस. असे ही तिने कळकळीने तिला सांगितले. हे सांगताना नंदिनीच्या आयुष्यातील पोकळी स्पष्ट होत होती. तिचे एकाकी जीवन खरच किती उदास, किती ध्येयहीन असेल या विचाराने शालिनीच्या पोटात तुटले.
मोलकरणीने चहा आणून दिला तेव्हा ५ वाजत आल्याचे दोघींना समजले. चहा घेता घेता नंदिनी आता निघते म्हणू लागली. खरं तर शालिनीच्या मुला-नातवंडांना भेटायच होत तिला पण ती तर उशिरा येणार असं त्यांनी कळवल्यामुळे नंदिनी परत जायला निघाली. पुनः नक्की येण्याचे वचन देऊन नंदिनी गेली.
शालिनीने तिला उंची साडी-श्रीफळ देऊन निरोप दिला. नंदिनी गेली तरी तिचे शब्द शालिनीच्या मनात घोळत होते. संध्याकाळी उशिरापर्यंत झोपाळ्यावर बसून दिवसभरातील गोष्टींचा आढावा घेत होती. तिला प्रश्न पडला होता कि नंदिनी जे काही म्हणाली त्यात असूया तर नव्हती ना? सहानुभूती मिळवण्यासाठी तर नसेल ना ती असं म्हणाली? हो एव्हढ नाव मिळवूनही फ मी कशी बिच्चारी आहे असं तर तिला दाखवायचे नसेल ना? पण लगेच तिच्या मनाने तिच्या या मताचा विरोध केला. नंदिनी ताशी नाहीच मुळी. आणि आपल्या सहानुभूतीची तिला गरजच काय? शिवाय ती म्हणते, विभाकर म्हणतात तेच बरोबर आहे.
आपल्याच विचारत हरवलेल्या शालीनीची तंद्री तुटली ती तिच्या नातवंडांच्या किलबिलाटाने. आजी आजी करत तिला मुलांनी घेरले. सहलीच्या गमती जमती सांगताना सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून आले होते. सहलीच आनंद तर होताच पण आजीला भेटल्याचा आनंदही होताच कि. शालिनीच्या मनात आल केव्हढ थोर हे भाग्य आपलं. नंदिनी अगदी बरोबर म्हणत होती. या आनंदापुढे जगातील कोणतेही सुख थिटेच आहे. त्या बाल-गोपाळांचे चिमणे बोल सप्त-सुरांप्रमाणे संगीताची जणू बरसात करू लागले. त्या सुरेल धारांनी तिला चिंब भिजवले. तिचे मन या आनंदाने तृप्त तृप्त झाले.
आता तिला आपल्या जीवनातील संचित कशात आहे हे जाणवले. हे सुख दाखवल्याबद्दल तिने मनोमन त्या
परमेश्वराचे आभार मानले.
तिच्या जीवनातील हरवलेला सूर तिला आता खऱ्या अर्थाने सापडला होता.

------------००------------------

       अल्पना लेले

साद

साद

जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी ती अस्वस्थ होऊ लागली. सात वाजले होते. काय हा उशीर? बाहेर अंधार
वाढू लागला होता. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले होते. जीवाची नुसती घालमेल होत होती. गॅलरीतून
आत बाहेर करून करून पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. गॅलरीत येऊन तिने पुन्हा एकदा दूरवर रस्त्यावर नजर टाकली. तिसऱ्या मजल्यावरून रस्ता लांबवर दिसतो.
रस्त्यावरचे दिवे पेटले होते. पण अजून पूर्ण अंधार न झाल्याने त्यांचा प्रकाश पडण्यापेक्षा त्रासच होतोय.
रस्त्यावर केव्हढी रहदारी होती? रिक्षा, टॅक्सी, गाड्या, सायकली, स्कूटर्स.. त्यात रस्त्याच्या कडेला बसलेल्या
विक्रेत्यांची गर्दी. संध्याकाळची वेळ, त्यामुळे रस्ता गजबजून गेला होता. ऑफिसातून येणारे लोक, फिरायला
जाणारे लोक, येणारे, जाणारे, भाजी घेणारे, भाजी विकणारे लोक, दुकानाच्या आत लोक, दुकानाच्या बाहेर लोक. कितीही माणस? पण या गर्दीत तिला तिची माणस दिसत नव्हती. भिरभिरत्या डोळ्यांनी ती आपल्या नवऱ्याला आणि सात वर्षाच्या लेकीला शोधत होती.त्यांच्या काळजीने ती व्यथित झाली होती. अजून कसे आले नाहीत? विचार करून करून डोके फुटायची वेळ आली होती. काय करावं तिला काही सुचेना. आजचा दिवसच वाईट. तिला सकाळचा प्रसंग आठवला.
आजचा दिवस रोजच्याप्रमाणेच घाई गडबडीचा उगवला होता. सकाळची काम, सगळ कसं रोजच्यासारख. तिचा आणि तिच्या – नवऱ्याचा- चहा झाल्यावर तिने- जाईला – त्यांच्या लाडक्या लेकीला हाक मारली. पण एका
हाकेला उठली तर ती जाई कसली? नावाप्रमाणेच नाजूक राणी होती तिची जाई. आई-बाबांची लाडकी जाई.
शालिनी आणि शेखरची एकुलती एक लेक. त्यांच्या गळ्यातला ताईत. तिचं हासण, खेळण, रुसण यांनी त्यांच्या आयुष्याला अर्थ दिला होता. लग्नानंतर तब्बल बारा वर्षांनी त्यांच्या संसारवेलीवर आलेलं ते फुल होत. तिच्या बाललीलांनी ते भरून पावत. तिचा प्रत्येक बाळहट्ट पुरवताना त्यांना स्वर्गीय आनंद होई.
रोजच्याप्रमाणेच आजही तिने जाईला पुन: पुन: हाका मारल्या. पण आज जाईने जरा जास्तच आळस केला.
उठेचना. कधीही शाळा न बुडवणारी जाई आज शाळेला जात नाही म्हणू लागली. हे म्हणजे अतीच झालं. अति
लाड झालेत. बास झाले लाड, मुकाट्याने उठ आणि शाळेत जा. शालिनी खरोखरच रागावली होती पण तिच्या या रागाला लेक बधली नाही. तिने बाबांकडे मोर्चा वळवला. झालं आता मात्र शालिनीचा पारा चढला आणि तिने
जाईच्या पाठीत एक धपाटा घातला. आयुष्यात पहिल्यांदाच तिने जाईवर हात उगारला. आणि दुसऱ्याच क्षणी
या करता स्वत:वर किती वैतागली होती ती. पण व्हायचं ते होऊन गेलं होत. आता मात्र जाईने असा काही आवाज काढला कि शालीनिनेही शरणागती पत्करली. खर तर शेखरचा विरोध असूनही शालिनीने जाईला सकाळच्या शाळेत घातले होते. कारण काय, तर जाईला सकाळी लवकर उठायची सवय लागावी. पण त्यामुळे रोजच सकाळी हे नाटक चाले. आधी उठा उठा, मग कसे तरी एकदाचे दात घासा, कसं तरी दुध-बिस्किट घशाखाली ढकला आणि एकदाची शाळेची बसं पकडली कि हुश्य होई. मग घरातील कामात शालिनीचा दिवस भरकन संपे. दुपारी जाई येईपर्यंत सुन सुन वाटणारं घर जाई आलीकी कि तिच्या चिवचिवाटाने भरून जाई. आज मात्र रडारडीला उतच आला. आईच्या हातून दुधही प्यायली नाही. सगळ काही बाबांकडून करून घेतलं. दुपारी शाळेतून आणायला बाबाच पाहिजे. पुन: लॉरेल-हार्डीचा पिक्चरपण बघायचा असं सगळ शिस्तीत कबूल करून घेतलं तेव्हाच बाईसाहेब शाळेत गेल्या. पुन: या कार्यक्रमाला आईला न्यायचं नाही..तिला टुकटुक. तेव्हा कुठे कळी खुलली राणी सरकारांची. दुपारी ठरल्याप्रमाणे शेखरचा फोन आला होता. शाळेतून जाईला घेऊन परस्पर सिनेमाला नेणार होता. पाच वाजतील म्हणाला घरी यायला. मग आता तर सात वाजले.. इतका वेळ कुठे राहिले? अजुन कसे आले नाहीत?
कितीतरी वेळ ती तशीच गॅलरीत उभी होती. शाळेतून परस्पर सिनेमाला गेलेत.. काय खाल्ल असेल? तिला काय म्हणा ते डोसा, सामोसा वगैरे आवडत तसलच काहीतरी खाल्ल असेल. पण त्याला किती वेळ झाला...शेखरला कळत नाही का? आता माझी छकुली येईल आणि आल्या आल्या भूक भूक करेल. हे विचार मनात येताच शालिनी लगबगीने आत आली. सहजच तिने भिंतीवरच्या घड्याळाकडे पहिले. बापरे नऊ वाजले! इतकी रागावलीस का ग आईवर? असा अंत पाहू नका हो माझा शेखर. साधा एक फोन तरी करायचा. माल काळजी वाटत असेल हे कळत कसं नाही तुम्हाला? आता येऊन वर माझीच टिंगल कराल. नाही नाही ते विचार येतायत हो माझ्या मनात.
रिकाम्या पोटी अखेर व्हायचे तेच झालं. क्षणात सर्व काही फिरतय असं तिला वाटलं. तोल जाऊन पडता पडता
तिने एक किंकाळी मारली आणि तिची शुद्ध हरपली.
मिटलेल्या डोळ्यांपलीकडे शालिनीला चाहूल लागली.  कुणाचे आवाज येतायत? ....कुठून येतायत हे आवाज?
....बाहेरून? नाही इथूनच, अगदी जवळून, कोण बोलत य ? कुणी तरी तिला हाका मारीत होते... कोण ते?
शालिनीने हळू हळू डोळे उघडले. तिच्या पलंगाभोवती बरीच मंडळी जमली होती.एक बाई विचारत होत्या
...काकू आता कसं वाटतय? (म्हणजे हे स्वप्न होत? ...माझी जाई? ...शेखर? ..आले का?) अहो उठू नका. झोपून
रहा बर. अशा कशा हो पडलात? काय हो सिस्टर तुमच लक्ष कुठे असत? अहो वय झालंय आता त्यांच. एखाद हाड बीड मोडलं असत म्हणजे? (वय?... माझं? अहो काय बोलताय?) पण त्या बाई काहीच ऐकत नव्हत्या. त्या
सिस्टरशी बोलत होत्या. आणि ते गॅलरीचं दार कुणी उघड टाकलं? बंद करा आधी ते. या काकूंना नादच आहे
गॅलरीत जायचा. उगीच तोल बील जायचा आणि नसती आफत यायची. (कोण काकू? मी? कोणाची बर काकू?)
बर का काकू पुन: ते दार उघडू नका. छान रखिडकीतून बघा हं बाहेरची गम्मत. सिस्टर मला आता कोणतीही
रिस्क घ्यायची नाही. या महिन्यात या दुसऱ्यांदा पडल्या. असं करूया... सरळ कुलूपच लावूया का? तुम्ही सरळ
कुलूप लावून टाका त्या दाराला. म्हणजे मग कटकट नको. कुठे कुठे म्हणून लक्ष ठेवणार? आणि सिस्टरनी
गॅलरीच्या दाराला कुलूप लावून टाकलं. शालिनीला खूप खूप वाईट वाटलं. ओरडून सांगावसं खूप वाटत होत. नका हो कुलूप घालू त्या दाराला .. माझी जाई, माझा शेखर आले नाहीत अजून. आत्ता येतील ते. डोळ्यात अश्रू घेऊन ती हताशपणे बघत राहिली. सर्व काही अस्पष्ट होऊ लागलं. तिने डोळे मिटून घेतले. हे सर्व काय चाललय? आपण नेमक्या कुठे आहोत? ह्या बायका कोण तिला काहीच कळेना. आपल्याला असं कोंडून का बऱ ठेवलय? पलीकडच्या खोलीत बायका दबक्या आवाजात काहीतरी बोलत होत्या. कुणाबद्दल बोलतायत त्या? आपल्याच बद्दल कि काय? ती लक्ष देऊन त्याचं बोलण ऐकू लागली. एक जण विचारत होती.. कोण हो या बाई? आणि इथे कशा? चांगल्या घरच्या दिसतात. कोणी तरी सांगू लागली.. चांगल्या घरच्या म्हणजे काय? चांगल्या खात्यापित्या घरच्या कि हो. नवरा, एक मुलगी सात वर्षाची, असा सुखी संसार. पण बाई आज इथे एकट्या आहेत. पण म्हणजे झालं तरी काय? पुन: पहिलीने  विचारलं. काय सांगू? सुमारे २५ वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल. या बाईंची मुलगी आणि नवरा कुठे बाहेर गेले होते म्हणे. या बाई अशाच गॅलरीत उभ्या राहून त्यांची वाट बघत होत्या. मग.. ? पहिलीने पुन: विचारलं. अहो मग काय? खूप उशिराने घरी आला तो एकता त्यांचा नवरा. आणि मुलीचं काय?
अहो ऐका तरी. मुलीचा म्हणे अपघात झाला होता. हात सोडून एकाएकी धावली आणि गाडीखाली आली.
अयाई ग ..इति पहिली. अहो एव्हढंच नाही तर मुलगी गेल्याचं कळल्यावर यांनी केलेला आक्रोश पाहून यांच्या
नवऱ्याने गॅलरीतून उडी मारून जीव दिला म्हणे. अरेरे काय बाई तरी एकेकाचं नशीब असत नाही? दोघी तिघी
हळहळल्या. हे ऐकलं आणि शालिनी अवाक झाली. हे मी काय ऐकते आहे? खरय का हे? तिला प्रश्न पडला. तिने ताडकन डोळे उघडले. आजूबाजूला पाहिलं. खरच हे काही माझं घर नाही. त्या छोटयाशा खोलीत जुजबी सामान
होत. एखाद्या हॉस्पीटल मधली ती खोली असावी. खोलीत एक पलंग, एक टेबल-खुर्ची आणि एक आरसा पण
होता. मोठ्या प्रयासाने शालिनी पलंगावरून खाली उतरली आणि हळूहळू आरशाजवळ गेली. आरशातील व्यक्ती तिच्या ओळखीची नव्हती. कुणी तरी वयस्क म्हातारी आरशातून तिच्याकडे बघत होती. कोण होती ती म्हातारी? केसांत चंदेरी झाक, डोळ्याभोवती काळी वर्तुळ, लोंबलेली निस्तेज कातडी असलेली ही बाई शालिनी कशी असेल? शालिनी तर चाळीशी ओलांडूनही कशी रसरशीत होती. काळेभोर लांब सडक केस, केतकी वर्ण, सतेज कांति, पाणीदार बदामी डोळे..छे छे ही शालिनी असूच शकत नाही. पण मग आरशात दिसणारी ती जर शालिनी नाही तर मग मी आहे तरी कोण? पण.. त्या बाई म्हणतात ते जर खर असेल तर ते रूप कुठे हरवलं? खरच का मी इतकी म्हातारी झाले आहे? हो नक्कीच तरीच त्या मला काकू म्हणत होत्या. याचा अर्थ मध्ये इतकी वर्ष गेली आपल्याला कळलेच नाही? काही न सुचून शालिनी पलंगावर जाऊन बसली. गेलेल्या काळाचे आश्चर्य करत राहिली.
असं कसं झालं? या प्रश्नाचे उत्तर शोधू लागली. शेखर आणि जाईच्या आठवणीत. आता फक्त आठवणीच होत्या. ते आता कधीच परत येणार नव्हते. तिला गहिवरून आले. डोळे पुन: भरून आले. तिने डोळे गच्च मिटून घेतले. डोळे मिटूनही भरून येतच राहिले. मिटलेल्या डोळ्यांनी ती पुन: एकदा नव्याने गत काळातील तो दिवस पाहू लागली.
तो काळा कुट्ट दिवस. पाच वाजेपर्यंत येणारी ती दोघ साडेसात वाजले तरी आली नव्हती. तिने आठवेल त्या
सर्वांकडे फोन केले. नातेवाईक, मित्र, कोणी कोणी सोडले नाही. वेड्यासारखी ती ज्याला त्याला त्या दोघांबद्दल
विचारत सुटली. कुणाकडून काही पत्ता लागत नव्हता. वेळ जात होता. साडेनऊ वाजलेले तिने पहिले आणि
इतक्यात दारावरची बेल वाजली. तिने धावतच जाऊन दार उघडलं.दारात बरीच लोकं होती. शेजारी आणि काही अनोळखी लोकं सुद्धा होती. आणि पोलीस? तिने ओरडूनच विचारलं जा माझ्या नवऱ्याला आणि मुलीला आधी शोधा जा. त्या पोलिसांच्या मागोमाग शेखर घरात आला. ती त्याच्या मागे जाईला शोधात राहिली. जाई? कुणी तरी पाठीवर हात ठेवला. काय नव्हत त्या स्पर्शात? दया , सहानुभूती, कीव .. ती एकदम लांब सरकली. हे काय चालवलंय तुम्ही? शेखर शेखर अहो जाई कुठय? शेखरने तिला जवळ घेतलं...आणि गदगदलेल्या स्वरात म्हणाला आपली जाई…  आपली जाई  आपल्याला सोडून गेली ग.
काय काय म्हणताय तुम्ही? शुध्दीवर आहात का? अशी कशी जाईल ती आपल्याला सोडून? अग खरच वाटत
नाहीये ग मला सुद्धा. दिवसभर किती मजेत होती ती. ठरल्याप्रमाणे मी तिच्या शाळेत गेलो... तुला फोन केला
होता ना मी? ती वाटच बघत होती. शाळेतून हॉटेलात गेलो. तिच्या आवडीचं सगळ खाल्ल प्यायलं. मग
सिनेमाला गेलो. हो हो मी तिकीट आधीच काढली होती. सिनेमा संपल्यावर मात्र तिला तुझी आठवण यायला
लागली.मग घरी यायची अगदी घाई झाली होती ग तिला. आम्ही टॅक्सी थांबवली. टॅक्सीत बसायला ती इतकी उतावीळ झाली कि माझा हात सोडून रस्त्यावर धावत सुटली. आणि मला काही समजायच्या आत पलीकडून येणाऱ्या गाडी खाली.... शेखरला पुढे बोलवेना आणि तिला ते ऐकवेना. तिने कानावर हात ठेवले. खोट खोट साफ खोट आहे हे. नाही ग मी खोट कशाला बोलू.  कुणीतरी तिला ओढून स्टे्चर जवळ आणल. चादर बाजूला केली. जाई? अग आई ग हे काय झालं? आई ग .. तिच्या त्या किंकाळीने सगळ्यांची मन हेलावली. जाई ... आकांत करणाऱ्या तिचं सांत्वन कसं होणार होत? जाईने खरच तिला टुकटुक  केलं होत. आईवर इतकं रागावत का कुणी? तिच्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेही नव्हती. रडता रडता तिने शेखरला विचारलं. पण मग इतका वेळ? मला फोन का नाही केला? अग हे सगळ घडलं आणि प्रथम तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. मग पोलीस, पंचनामा आणि डॉक्टरांनी हात टेकल्यावर काय फोन करणार होतो मी तुला? आपली जाई गेली हे मी तुला फोनवर कसं बर सांगणार होतो? मला माफ कर शालू मी आपल्या जाईला सांभाळू शकलो नाही ग . मला माफ कर. एव्हढ ऐकलं आणि शालिनी एखाद्या वाघीणी सारखी चवताळून उठली. ती शेखरवर हातांनी वार करू लागली. माझी जाई मला परत आणून द्या. तिच्यशिवाय घरी आलातच कसे? तुम्हीच मारलंत माझ्या जाईला. तिच्या या आकस्मीत प्रतिक्रियेने लोकं अवाक झाली. शालिनीने त्याला ढकलत ढकलत गॅलरीत नेलं होत. तिच्या या हल्ल्याला शेखर परतविण्याचा प्रयत्न करत होता. शालिनी रडत होती आणि झोंबाझोंबीही करत होती. शेखर तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता.आणि अचानक शेखर गॅलरीतून खाली कोसळला. शेखर ऽऽऽऽऽ लोक
म्हणतात तुम्ही आत्महत्या केली. आत्महत्या? पण का? नाही नाही ते आत्महत्या करण शक्य नाही. मी ... हो मीच कारणीभूत आहे या सर्वाला. त्याचीच शिक्षा आहे ही. पण आणखी किती शिक्षा भोगायची आहे? मला एकटीला सोडून जाताना काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? किती प्रेम आहे माझं तुम्हा दोघांवर. माहित आहे ना? तुम्ही दोघही गेलात ना मला एकटीला टाकून... मी कधीची वाट पाहते आहे तुमची. आणखी किती सतावणार आहात मला? हा खेळ थांबवा हो आता....परत या परत या.….
आज त्या गोष्टीला किती वर्ष झाली कुणास ठाऊक २५?..३०? पण आजही तो दिवस तिच्या स्मृतीत अगदी काल घडल्या प्रमाणे जसाच्या तसा कोरला गेला आहे. आजही ती वाट पाहते आहे शेखरची, जाईची. तिच्यासाठी जणू काळ पुढे सरकलाच नाही. तिच्याप्रमाणे त्यालाही (काळ) प्रतीक्षा आहे त्या दोघांची. तिच्या बरोबर जणू तोही शेखर व जाईला साद घालतो आहे.

अल्पना लेले  (वर्ष २००८).