गंधर्व ते स्वर्ग लोकीचे

गंधर्व ते स्वर्ग लोकीचे






१ मे , महाराष्ट्र दिन अर्थात विश्व कामगार दिन !!
अजून एका कारणाकरता हा दिवस महाराष्ट्रीय चित्रकारांकरता अतिशय महत्वाचा ठरतो...

 

गेल्या शतकातील एका अतिशय प्रतिभावान चित्रकार तसेच अनेक प्रतिभावान चित्रकारांचे जे गुरु त्या 
कै. कृष्णराव केतकर यांचा हा जन्मदिन
भारताच्या कलाविश्वातील त्यांचे योगदान सुवर्णाक्षरात लिहिले जावे असे आहे. गेल्या दशकातले अतिशय सन्माननीय चित्रकार . महाराष्ट्राच्या कलाविश्वाला अनेक प्रतिभावान चित्रकारांची रत्न रुपी देणगी देउन महराष्ट्राबरोबरच भारत देशाच्या कलावैभवाला  जगात मानाचे स्थान मिळवून देणारे ते स्वतः एक कर्मयोगीच होते. ते स्वतः एक चित्रकार तर होतेच पण त्याचबरोबर त्यांनी अनेक महान चित्रकार घडवले. 
मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून आर्ट मास्टर होणारे ते पहिले भारतीय चित्रकार . इतकच नव्हे तर मेयो हे सुवर्णपदक मिळविणारे असे ते चित्रकार होते.
जे.जे.मधील युरोपिअन व पारशी लोकांच्या भाऊगर्दीत मराठी मध्यमवर्गीय विद्यार्थ्याची कुचंबणा पाहून मुंबईतील पहिली कला संस्था Ketkar Art Institute त्यांनी १९१५ साली सुरु केली. या संस्थेत मराठी मध्यम वर्गीय व प्रतिभावान अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना चित्रकलेचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जात असे. प्रवेश शुल्क न परवडणारे शिष्य हि इथे जेऊन खावून कलाप्रशिक्षण मिळवत असत. महाराष्ट्राच्या कला विश्वाला असा हा आचार्य लाभला आणि त्याच्या परीस स्पर्शाने सोन्यासारखी प्रतिभा असलेले कलाकार घडत गेले. या संस्थेतून एक से एक नामवंत कलाकार महाराष्ट्राला मिळाले. आरा,  माळी,  अडूरकरआडारकर,  दलाल,  देऊस्कर,  आचरेकर,  गोंधळेकर,  ठोसर,  भोबे,  अहिवासी.... असे किती तरी नामवंत चित्रकार केतकर मास्तरांच्या हाताखाली प्रशिक्षित झाले.

त्यांचे शिष्य एम. आर. आचरेकर हे आर,  के. स्टूडीओ मध्ये कला निदर्शक म्हणून कार्यरत होते. स्वतः पृथ्वीराज कपूर आचरेकरांकडून चित्रकला शिकत. एकदा आर. के. स्टूडीओच्या एका समारंभात केतकर मास्तर आचरेकरा सोबत गेले असता पृथ्वीराज कपूर यांनी भर समारंभात त्यांच्या गुरूंचे गुरु म्हणून केतकर मास्तरांच्या पायांवर मस्तक ठेवले होते.

धन्य ते गुरु व धन्य त्यांचे शिष्य.

केतकर मास्तरांच्या हाताखाली इतके उच्च दर्जाचे कलाकार उदयास आले कि या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना प्रेमादराने आर्ट मास्टर ऐवजी Artist maker  म्हणून संबोधिले जाऊ लागले. 
अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.
ते स्वतः निसर्ग चित्रण व व्यक्ती चित्रणात निष्णात होते व जलरंगांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. 
औंध चे संस्थानिक श्री भवानराव पंत प्रतिनिधी यांनी काही निवडक चित्रकारांसह सचित्र शिव चरित्र १९३० मध्ये प्रकाशित केले व त्यानंतर अजिंठा वेरूळ मधील चित्र शिल्पांवर एक पुस्तक ही प्रकाशित केले. या दोन्ही प्रकल्पांमध्ये केतकर मास्तरांचा सक्रीय सहभाग होता . औंध व बडोदा संस्थानातील संग्रहालयातच नव्हे तर लंडन आर्ट म्युझिअम व विएन्ना मध्ये हि त्यांची चित्रे संग्रहित केलेली आहेत. चित्रकले बरोबर संगीत/ गायन लेखन अभिनय अशा अनेक कलांमध्ये ते पारंगत होते. शास्त्रीय संगीताचे गायनाचे कार्यक्रम ते करत असत. पुण्याहून हल्ला या मामा वरेरकर व आचार्य अत्रे यांच्या मूक पटातून त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका वठवली होती. ६ फूट उंची व देखणे व्यक्तिमत्व लाभलेले केतकर मास्तर पृथ्वीतलावर अवतरलेले कुणी गंधर्वच होते जणू.





कै.सौ. नेत्रा साठे या त्यांच्या कन्या . वडिलांकडून सर्व कलांगुणांचा वारसा त्यांना मिळाला होता.
त्याही जे.जे. स्कूल च्या विद्यार्थिनी होत्या. १९६० सालापासून वयाच्या ७५  व्या वर्षापर्यंत त्यांनी कलेची साधना केली.  वडिलांप्रमाणेच नेत्रा साठे यांना देखील व्यक्ती चित्रणात विशेष सिद्धी प्राप्त होती. अनेक मान्यवरांचे portraits त्यांनी केले. सी. डी. देशमुख वेणूताई चव्हाणअशा अनेक मान्यवरांचे portrait  व हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील जस्टीस नागेंद्र सिंह यांचे portrait  ही काही ठळक उदाहरणे. त्याच बरोबर कल्याण गायन समाजाच्या सभागृहात लागलेले पं.भास्करबुवा बखले यांचे तैल रंगांतील portrait हे त्यांच्या सृजनात्मक कालावैभावाची साक्ष ठरावे. कला प्रेमींनी त्यांची हि कलाकृती आवर्जून पहावी. pestals  व तैल रंगातूनच त्यांनी चित्रसाधनेला सुरुवात केली परंतु ७० च्या दशकात त्यांनी पोलीयेस्तर रेझीनचा उपयोग चित्रे रंगवण्यासाठी केला ( यालाच आज कोल्ड सिरामिक म्हणतात) व  या माध्यमातून चित्रे रंगवणाऱ्या त्या पहिल्या चित्रकार ठरल्या . त्यांच्या या चित्र शैलीने त्याच्या चित्रांना भारतातच नव्हे तर भारताबाहेरही मान सन्मान व लौकिक मिळवून दिला. कला जगताला त्यांनी दिलेला हा एक अत्यंत मूल्यवान नजराणा होता. नेत्रा साठे यांनी ५० हून अधिक चित्र प्रदर्शने भारतात व भारताबाहेर भरवली.  अनेक प्रतिष्ठित मान्यवरांकडे व कॉर्पोरेट हौसेस मध्ये नेत्रा साठे यांची चित्रे आजही  मानाने विराजमान आहेत. वडिलां प्रमाणेच त्यानाही लेखन काव्य संगीत नृत्य नाट्य अभिनय अशा सर्व कलांमध्ये रुची होती आणि त्यांनी या सर्व आघाडींवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला .चित्रकला व अन्य कलांमधील त्यांच्या विशेष कामगिरी बद्दल त्यांना कल्याण गौरव या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. कधीही कोणत्या ही स्पर्धेत भाग न घेता त्यांची चित्र हीच त्यांच्या योग्यतेची ग्वाही देतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा अनेक होतकरू कलाकारांनी लाभ घेतला आहे.

मी स्वतः एक चित्रकार असून  कै.सौ. नेत्रा साठे  व जगप्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांची मी मुलगी .
कलेचा वारसा आजोबांपासुन व माझ्या आई वडिलांकडून मला मिळाला. मी हि एक शिल्पकार व चित्रकार असून  या दोन्ही प्रांतात मी पुरस्कार ही मिळवलेले आहेत. १९७८ साली ललित कला चा पुरस्कार माझ्या शिल्पाला मिळाला होता तर १९६७ साली सोवियत नेहरू अवार्ड हा अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार मला मिळाला होता.
आजवर २५ हून अधिक प्रदर्शन भारतात व भारताबाहेर  मी भरवली आहेत. आई वडील व आजोबांच्या आशीर्वादाने हे सर्व शक्य झाले.

हे सर्व इथे मांडण्याचे कारण म्हणजे नुकताच २०१३ साली "दृश्य कला खंड" नामक महाराष्ट्रीय कलाकारांचा एक शिल्पकार चरित्रकोष तयार करण्यात आला. त्यात लहान मोठ्या अनेक चित्रकार शिल्पकारांचा समावेश करण्यात आला. चित्रकारांची निवड करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या कोषाचे संपादक सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर हे होते. जवळपास ६ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे कळले व मोठ्या गाजावाजात त्याचा प्रकाशन सोहळा हि जहांगीर आर्ट गलेरी येथे पार पडला.

हे प्रकाशन झाले माझे वडील शिल्पकार सदाशिव साठे ( नेत्रा साठे यांचे पती व चित्रकार केतकर यांचे जावई) यांच्या हस्ते. प्रकाशन सोहळ्यानंतर प्रत हातात पडली (आधी नाही). त्यात केवळ शिल्पकार साठे यांचेच नाव दिसून आले . चित्रकार कृष्णराव केतकर व चित्रकार सौ. नेत्रा साठे यांचे नाव ( आणि अर्थात माझे हि नाव ) या कोशात नव्हते.

(बहुधा याच कारणास्तव ती प्रत माझ्या वडिलांच्या हाती आधी न पडू न देण्याची विशेष खबरदारी घेतली गेली होती !)

यासंबंधी प्रश्न विचारल्यावर अपेक्षे प्रमाणे गुळमुळीत अशीच उत्तरे मिळाली. चित्रांचे फोटो उपलब्ध नव्हते.... इथ पासून समितीने ठरवलेल्या निकषात (?)  हे कलाकार बसत नव्हते.... अशी बीन बुडाची स्पष्टीकरणं देण्यात आली.
चित्रकार केतकर यांच्या कलाकृतीविषयीची हवी ती माहिती आमच्या परिवारातील कुणीही आनंदाने दिली असती असे असताना ती  माहिती विचारायला आमच्या परिवारातील कुणाशीही संपर्क साधण्याची साधी तसदी ही न घेता काही हि माहिती उपलब्ध नव्हती असे स्पष्टीकरण दिले गेले. केतकर मास्तरंची चित्रे असलेली वर उल्लेखित पुस्तके माझ्याकडे उपलब्ध आहेत हे मी इथे नमूद करू इच्छिते.

नेत्रा साठे या देखील त्यावेळेस हयात होत्या त्यामुळे  नेत्रा साठे यांची चित्र उपलब्ध नव्हती हे म्हणणे फारच धाडसाचे ठरेल. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या चित्रांचे फोटो व इतर माहिती मिळवणे सहज शक्य होतं.

आज स्वतः चित्रकार सुहास बहुलकर विलेपार्ले मध्ये जिथे राहतात त्या मार्गाचे नाव  चित्रकार केतकर मार्ग  असे आहे. आणि तरीही चित्रकार केतकर हे निवड समितीने निर्धारित केलेल्या निकषांवर चित्रकारच ठरले नाहीत !!?  
या शिवाय या कोशात केतकर मास्तरांकडे प्रशिक्षण घेतलेल्या व वर उल्लेखित कीर्तीप्राप्त चित्रकारांचा समावेश तर आहेच पण त्या सर्वांच्या बद्दलच्या माहितीत ketkar art institute  चा आवर्जून उल्लेख आहे . असे असताना स्वतः केतकर मास्तरांचे नाव या कोशातून वगळले जाणे किती दुर्दैवी आहे... दुर्दैवाने त्या ज्येष्ठ कलाकारांपैकी आज कुणीच केतकर मास्तरांची महती सांगायला हयात नाहीत .
असे अनेक कलाकार या कोशात समाविष्ट असतील ज्यांच्या विषयी खूप त्रोटक माहिती उपलब्ध आहे पण म्हणून ते कलाकार ठरतच नाहीत का?  
कोशातील  निकषानुसार कमीत कमी २५ वर्ष कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांचा समावेश या कोशात केला गेलेला आहे. मी स्वतः जवळपास ३५ वर्ष कलाक्षेत्रात सक्रीय आहे आणि माझ्या चित्रांची २५ हून अधिक एकल प्रदर्शनं भारतात व भारताबाहेर भरवली आहेत  . पण केतकर मास्तर व सौ नेत्रा साठे या प्रतिभावान कलाकारांनी तर त्यांचे उभे आयुष्य या क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देत खर्ची घातले . वाईट या गोष्टीचे वाटते कि कला क्षेत्राला वाहून घेतलेल्या अशा या गुणी प्रतिभासंपन्न कलाकारांचा या कोशात समावेश न करता त्यांचा हक्काचा मान नाकारण्यात आला आहे.

कलाकारांच्या गुणवत्तेविषयी निर्णय घेण्याचा हक्क या कोषाच्या निवड समितीला होता का  त्यांचे कार्य केवळ जंत्री बनवण्याचे होते. शेवटी गुणवत्तेच्या थोरवीची जाण असणे हि बाब हीदेखील जगात  अभावानेच दिसते हेच सत्य आहे.

हा कोष देशातील कलाकारांची माहिती उपलब्ध करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेला आहेपण दुर्दैवाने तो हेतू पूर्णपणे साध्य झालेला नाहीये. देशातील नामवंत प्रतिभावान कलाकार या कोशातून वगळल्याने हा कोष अपूर्ण राहिला आहे आणि म्हणूच त्याचा दर्जा हा निकृष्ट ठरतो. भारताबाहेरील कलाप्रेमी व आर्ट स्कूल मधील विद्यार्थी याचा अभ्यास करतीलतेव्हा भारतीय कला इतिहासाचे अपूर्ण स्वरूपच त्यांच्या पुढे येईल. देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने हे योग्य ठरेल का ?केतकर मास्तरांना व नेत्रा साठे यांना ओळखणारे त्यांच्या कर्तृत्वाची जाण असणारे असंख्य लोक या जगात आहेत. या कोशात त्यांचे नाव समाविष्ट न झाल्याने त्यांची महती नक्कीच कमी होणार नाही. कला विश्वातील त्यांच्या योगदानाचा व कर्तृत्वाचा ठसा काही निवडक लोकांच्या संकुचित मनोवृत्तीने पुसू म्हंटल तरी पुसता येणार नाही. स्वर्गातून अवतरलेल्या गन्धर्वांप्रमाणेच ते या भूतलावर आले आणि कलेची उधळण करून गेले.

१ मे हा दिवस भारतीय कला विश्वात एका दिग्गज कलाकाराची जयंती म्हणून स्मरणात राहिलच. आणि त्यांच्या गुणवत्तेचे ठसे व कलेचे भक्त या गुणी जनांचे विस्मरण होऊ देणार नाहीत हे नक्की.
त्यांच्या पवित्र स्मृतीस माझे शतशः प्रणाम.








No comments:

Post a Comment