Tuesday 5 December 2017

शिल्पकार सदाशिव साठे


तो यक्ष, एक कल्पवृक्ष !
कलाकार मग तो चित्रकार असो वा शिल्पकार, भूतलावरचा यक्षच तो..नित्य नव्या कलाकृत्या घडवणारा, प्रती सृष्टी निर्माण करण्याची प्रतिभा असणारा..अनेक शिल्पांच्या रूपाने. असा एक यक्ष मी पाहिला . त्या यक्षाने निर्माण केलेल्या सृष्टीत आमचे जग सामावलेले होते. लहानपणापासून मी याच कलामय वातावरणात वाढले....तो यक्ष, माझे वडील, होयमाझे वडील... आमचे लाडके भाऊ...! एक कलाकार, एक शिल्पकार  ... शिल्पकार सदाशिव साठे...
जगासाठी एक जागतिक कीर्तीचे कलाकार. पण आमच्या साठी आमचे भाऊ...
अनेक स्मारक शिल्पांचे निर्माता ......   
जन्मतःच कलात्मकतेची  देणगी घेऊन आले....
शिल्पकला,  मूर्तीकला ही साठे घराण्यात भाऊंच्या आधीच्या पिढीपासूनच होती. भाऊंचे हरिकाका उत्तम गणेश मूर्ती बनवत . त्यांचा कल्याणात गणपतीचा कारखाना होता. भाऊ म्हणतात कि त्यांना पहिले धडे त्यांच्या काकांच्या मांडीवर बसूनच मिळाले. गणपतीच्या मातीशी खेळताना ते सहजच एखादा आकार साकारत. त्यांच्या हरिकाकांकडून त्यांना शिल्पकलेत कारकीर्द करण्याकरता खरे प्रोत्साहन मिळाले. मात्र त्यांनी शिल्पकलेचं शास्त्र शुद्ध शिक्षण घ्यावे असे काकांचे मत होते. त्याकरता त्यांनी आधी मॅट्रिक व्हावं आणि मग आर्ट स्कूलला जावं हा काकांचा आग्रह होता. काकांच्या प्रोत्साहनाने भाऊंनी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिल्पकलेचे तांत्रिक शिक्षण घेण्याकरता प्रवेश घेतला. ते शिक्षण त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण केले. ते ही सुवर्ण पदक आणि मेयो सुवर्ण पदक संपादन करून. या अभ्यासक्रमा दरम्यान ते त्यांच्या सर्व शिक्षकांचे पट्ट शिष्य होते. अभ्यास क्रमाच्या अंतिम वर्षी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट च्या वार्षिक रिपोर्ट च्या अंकात त्यांनी केलेल्या शिल्पकृतीचा फोटो छापून आला होता. व स्वतः डीन ने त्यांचे कौतुक केले होते.
४ वर्षाचा अभ्यास क्रम पूर्ण करून १९४८ साली आर्ट स्कूल मधून बाहेर पडल्यावर काही काळ भाऊंनी एकदोन किरकोळ नोकऱ्या केल्या. मुंबईला शांतारामबापूंच्या राजकमल मध्ये त्यांनी काही काळ काम केले. परछाई सिनेमाच्या सेट साठी त्यांनी मूर्त्या घडवल्याचे ते सांगतात. पण त्या क्षेत्रात कितीही झगमगाट असला तरी स्वतंत्र सृजनात्मक कलानिर्मितीला मुळीच वाव नाही ही त्यांना सतत टोचणी होती. अखेर कंटाळून त्यांनी ते काम सोडले व १९५२ मध्ये नशीब काढण्यासाठी ते दिल्लीला गेले.. दिल्लीतही प्रथम नोकरी मिळाली ती जुन्या मौल्यवान कलाकृतींच्या नकला करण्याची. त्यातही पुन्हा कला-कुसरच आली. वर्षभरानंतर याही नोकरीला राम राम करून स्वतंत्र कलानिर्मितीचे क्षेत्र त्यांनी चोखाळायचे ठरविले.
आपला जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधील अभ्यासक्रम पूर्ण करून भाऊ बाहेर पडले तेव्हा देश नुकताच स्वतंत्र झालेला होता. पूर्वीचे कलांचे आश्रयदाते नामशेष होत होते. नवा राजाश्रय सुरु व्हायचा होता. अशा काळात आपल्या भाग्योदयाचा मार्ग भाऊंना चोखाळायचा होता. त्यांचा कलाक्षेत्रातील उमेदवारीचा तो काळ. नोकरी सोडल्याची बातमी घरी कळल्यावर कल्याणला परत येण्याचा काकांचा निरोप आला. पण काहीतरी भरघोस करून दाखवल्याशिवाय घरी परत जायचे नाही हा भाऊंचा निश्चय होता. या काळात मागे राहून कुणाच भलं होत नाही हे त्यांनी पक्के ध्यानी घेतले. त्या काळात दिल्लीला गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती करणेव इतर बारीक सारीक कामे करणे असे चालू होते. दिल्लीत मोठे काम मिळविण्यासाठी नमुना दाखल एखाद्या मोठ्या व्यक्तीचा बस्ट करावा अशी कल्पना त्यांना सुचली. त्याकरता तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुखांशी संपर्क साधून त्यांचा बस्ट बनवण्यासाठी त्यांची सिटींग त्यांनी मिळविली. आणि त्यांचे उत्कृष्ट असे बस्ट तयार केले. स्वतः सी डी देशमुखांना ही ते खूप आवडले. आता त्यांच्याकडे त्यांच्या शिल्पकलेतील कौशल्याचा नमुना होता. एखादे नवे काम मिळवण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचे असे पाऊल ठरणार होते.
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हां भारताच्या राजधानीत भारतीय शिल्पकाराने घडवलेला एकही पुतळा नव्हता. त्याच अनुषंगाने याच दरम्यान गांधी स्मारक समितीतर्फे म. गांधींच्या ९ फुटी पूर्णाकृती पुतळयाच्या प्रकल्पासाठी तत्कालीन वृत्तपत्रांत शिल्पकारांना आवाहन करण्यात आले. स्मारकाचे काम उत्तम रचनाकाराला मिळणार होते. गांधी पुतळ्याचा हा पहिलाच आणि म्हणूनच प्रतिष्ठित असा प्रकल्प होता. भाऊंच्या वाचनात हे येताच त्यांच्या मनाने कौल दिला ..हे काम आपल्यासाठीच आहे... मग काय? भाऊंनी ते काम मिळवण्याचा चंगच बांधला. त्यांनी गांधींचे वेगवेगळ्या पोझेस मधील फोटो गोळा केले. त्यांच्या बद्दल मिळेल ते साहित्य वाचून काढलं. त्यांचा स्वभावत्यांची विचारधारात्यांचे धोरण सर्वांचा सखोल अभ्यास केला. आणि त्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिल्पाची कल्पना भाऊंच्या मनात तयार झाली.
स्पर्धेत उतरायचे तर छोटे मॉडेल करून सबमिट करायचे होते. जेमतेम पंचविशीतील अननुभवी भाऊ आणि त्यांची स्पर्धा होती अनेक मोठमोठ्या अनुभवी शिल्पाकारांशी. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारले होते. त्यांच्या मनातील प्रतिमा त्यांनी दीड फुटी मॉडेल मध्ये उतरवली. त्यांनी साकारलेले गांधी वयोवृद्ध काठी घेऊन चालत निघालेले गांधी होते. नौखालीच्या हत्याकांडामुळे विमनस्क झालेल्या विचारमग्न महात्मा गांधींचे व्यक्तिमत्व त्यांनी  आपल्या शिल्पकृतीत साकार केले होते.
आपण कसोटीला उतरतो कि नाही ही मनातील साशंकताआणि काहीतरी विडंबन करण्यापेक्षा पुतळा न केलेला बरा’ हे पंडितजींचे कानी आलेले उद्गारआणि सर्व परिश्रमांचे केवढे प्रचंड असे मानसिक चढ-उतार भाऊंनी अनुभवले होते! मनात धाकधुक होतीच.
त्यांचे ते मॉडेल पाहून डॉ. सुशीला नायर यांच्यासारख्या गांधीजींच्या निकटवर्तीयांकडून ’this is the best i have seen of bapuji’s statues. Most lifelike’. हे सहजोद्गार निघाले. अखेर त्यांच्या परिश्रमाचं व जिद्दीच चीज झालं व भारतातील पहिल्या गांधी पुतळयाच काम भाऊंना मिळालं.
समितीपर्यंत पोहोचण्यापासून ते काम हातावेगळे करेपर्यंत नी पंडितजिंसारख्या महनीय व्यक्तीच्या शेजारी शिल्पकार म्हणून बहुमानाच्या खुर्चीत विराजमान होईपर्यंत त्यांनी आर्थिकमानसिक व शारीरिक अडथळ्याशी केवढी झुंज दिली.
पोरसवदा वयात हाती आलेलं हे एवढे जबाबदारीच व प्रतिष्ठेचे काम. अखेर पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी, “ इस महान कलाकृतीको साकार करनेवाले युवा कलाकार श्री. सदाशिव साठे” या पुकाऱ्याबरोबर देशातील पहिल्या गांधी पुतळ्याकरता राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यात सुवर्णपदक घातले गेले.
त्यावेळी पहिल्या रांगेत मानाने स्थानापन्न झालेल्या कुटुंबियांना आपला भाऊ मोठा झालेला पहायला मिळाले. भाऊंना करमरकरांसारखा शिल्पकार’ करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या काकांना मिळाले. आणि साश्रू डोळ्यांनी त्यांचे हे कौतुक माझ्या आजी आजोबांनी पहिले.
त्यांचा हा उमेदवारीचा काळ अतिशय कष्टाचा होता. कुटुंबात कोणी शिल्पकार नाही. आर्थिक स्थिती जेमतेम. कोणाचा पाठींबा नाही. अशा स्थितीत केवळ गुणवत्तेच्या आधारावर त्यांनी महात्माजींचा पूर्णाकृती नऊ फुटी पुतळा निर्माण केला.
आजही दिल्लीमुंबईग्वाल्हेरनागपूरगोहाटी या सर्व ठिकाणी त्यांनी घडवलेल्याबसवलेल्या प्रचंड पुतळ्यांकडे पाहिले कि जाणवते किशिल्पकला ही केवळ कला नाही तर ती दैव योगाने मिळालेली अशी देणगी आहे आणि ती ज्यांना मिळते ते या पृथ्वीतलावर अवतरलेले यक्षच असतात. आणि भाऊंच्या प्रत्येक कलाकृतीतून तो यक्ष पुन्हा पुन्हा मला भेटतो .या सर्व स्मारक शिल्पांबरोबरच त्यांनी घडवलेली स्वयम्प्रेरीत शिल्पं अशी आहेत कि जी बघताना आपल्याला दिसतो तो त्यांच्यातील संवेदनशील कलाकार.
त्यांच्या अशाच काही स्वयम्प्रेरीत कालाकृतीपैकी, एका उमलत्या कळी प्रमाणे नुकत्याच वयात आलेल्या युवतीचे हेड ..द बड ...याच प्रमाणे माझ्या पासून ते माझ्या मुलांपर्यंत त्यांनी केलेली लहान मुलांची शिल्पं . त्या शिल्पातील माध्यमाच्या अवजडपणावर मात करणारी, त्यांनी साकारलेली बालसुलभ मृदुता ही केवळ अवर्णनीय आहे. सिटींगवरून पोर्ट्रेट करण्याचे त्यांचे स्वतःचे असे तंत्र त्यांनी निर्माण केले आहे. ते अतिशय कमी वेळात समोरील व्यक्तीचे व्यक्तिमत्व शिल्पात बंदिस्त करतात. समोरच्या व्यक्तीस हलतं बोलतं ठेऊन ते त्यांचे शिल्प पूर्ण करतात.  समोरच्या व्यक्तीस सहज हालचाली करू देतात. यामुळे त्यांनी साकारलेले मॉडेल अगदी सजीव बोलके भासते. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील कोवळेपण आणि डोळ्यातील भाव हे सर्व ते अतिशय सहज रित्या पकडतात. पुन्हा मोठ्या माणसांप्रमाणे मुलं एका जागी स्थिर बसणे केवळ अशक्य. त्यांच्याशी हसत खेळत ते शिल्प घडवतात. उदाहरणच द्यायचे झाले तर माझ्या २ वर्षाच्या भावाचे शिल्पं करताना माझी आई त्याच्यासमोर सतत मातीचे छोटे गोळे फेकत होती . मातीचा गोळा जमिनीवर आपटताच एक गमतीशीर “पचक” असा आवाज होई. तो ऐकून माझ्या  भावाला हसू येई. त्याला असे सतत हसत ठेवून त्याचे अतिशय जिवंत असे हसरे शिल्प त्यांनी तयार केले.
मी जेव्हा बडोद्याला आर्ट कॉलेज मध्ये शिल्पकला शिकत होते तेव्हा मला लहानपणापासून मिळालेल्या या बाळकडू चा खूप उपयोग झाला. लहानपणापासून मी भाऊंना शिल्पं घडवताना पहिले आहे. शिल्पं करताना ते कसे तन्मय होतात हे मला माहित आहे. त्यासाठी लागणारी चिकाटी आणि जिद्द हि मी अनुभवली आहे.
१९५६ साली त्यांचे लग्न झाल्यावर त्यांनी केलेला आईचा अर्ध पुतळा हा माझ्या मते त्यांचे सर्वोत्तम शिल्प आहे. त्यातील आईच्या डोळ्यातील भाव व ओठांवरचे अस्फुट हसु अतिशय मोहक आहे. आई त्यांच्या साठी मोडेलिंग ही करत असे. दिल्लीच्या सुभाष पार्क मधील सुभाष चंद्र बोसांच्या स्मारकात खुद्द सुभाष चंद्र व त्यांच्या आझाद हिंद सेनेतील ४ जवानाना हि भाऊंनी समाविष्ट केले आहे. त्यातील स्त्री सैनिकाचा पुतळा करताना आईला आम्ही सैनिकाच्या गणवेशात उभी राहिलेले पाहिलं आहे.
तसंच सुरुवातीला अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा करताना खरा खुरा घोडा भाऊंनी दारात आणून बांधला होता. नंतर मग इतके घोडेस्वारांचे पुतळे त्यांनी घडवले कि मग त्यांच्या समोर घोडा नसतानाही त्यांच्या हातून एक से एक दमदार घोडे घडत गेले.
त्यांनी घडवलेले पुतळे,  प्रत्यक्षात न आलेल्या अनेक स्मारकांच्या त्यांच्या कल्पना आणि स्वानंदासाठी त्यांनी निर्माण केलेल्या शिल्पकृती पाहताना जाणवते कि त्यांची प्रत्येक निर्मिती ही एका विचारवंत कलावंताची निर्मिती आहे.
कोयनेचा भूकंप झाला नसता तर कोयनेचे धरण निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञांचा पराक्रम शिल्पाच्या रूपाने भाऊंच्या  शिल्पातून  उभा राहिला असता. त्याचे मॉडेल बघितले तर पृथ्वी-आप-तेज या तीन आदिशक्तींवर नियंत्रण करणाऱ्या मानवाचे एक अजोड शिल्प हे एका कलावंताचे स्वप्न शिल्प म्हणूनच लक्षात राहते. ही कलाकृती त्यांची स्वतःची अतिशय आवडती अशी कलाकृती आहे. दुर्दैवाने हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. या शिल्पाच्या सृजनामागील एकूण भावच इतका जबरदस्त आहे कि पाहणारा भारावून जातो. तीन आदिशक्तींना तीन उधळलेल्या घोड्यांच्या रुपात दर्शवून त्यांना नियंत्रित करणारा मानव ही संकल्पना च अफाट आहे.
त्यांनी स्वानंदासाठी निर्मिलेली शिल्पं देखील त्यांच्यातील सहज सुलभ कलाकाराची ओळख करून देतात.
साठ वर्षापूर्वी निर्माण केलेले बिऱ्हाड दुचाकीच्या पाठीवर’ हे दोन मुलांसह सायकलवरून दिल्लीच्या मुख्य रस्त्यावरून बेधडक जाणाऱ्या प्रवाशाचे शिल्प बघितले तर शिल्पकाराचे सृजन म्हणजे काय हे जाणवते. त्या सायकलस्वारांचे आनंदी चेहरेमागे बसलेल्या पत्नीच्या शरीराला आलेला बांक, तिचा उडणारा पदर,  सायकलच्या चाकांमधून होणारी गतीची जाणीव अशा त्या छोट्याशा शिल्पातील अनेक बारकावे भाऊंची निरीक्षण शीलता दाखवतात.
त्यांनी निर्माण केलेला ब्रॉन्झमधला मासा किंवा नाग बघावा. ही अमूर्त शिल्पे आहेत. त्या नागाची सळसळणारी गतिमानता शिल्पातसुद्धा जाणवते.
झाशीची राणी अमर झाली ती १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात एखाद्या ज्योतीसारखी क्षणकाल चमकून पटकन विझून जाण्यामुळे. त्यामुळे पाठीवर मुल घेतलेली घोडेस्वार लक्ष्मीबाई भाऊंच्या शिल्पात आलेली नाही. तर दोन पायावर उभ्या राहिलेल्या घोड्यावरून लढणाऱ्या झाशीच्या राणीचे दर्शन ते घडवतात. विजेसारखी चमकून गेलेली झाशीची राणी’ हे केवळ स्मारकशिल्प नाही तर एक सृजनशिल्प आहे. हे शिल्प त्यांचे आवडते शिल्प असल्यास नवल ते काय?
रायगड स्मारक किंवा बुद्ध स्मारक अशा प्रत्येक संकल्पनेत भाऊंची नव-निर्मितीची प्रतिभा थक्क करणारी आहे. त्यांच्या या कलाकृतींनी मला नेहमीच विस्मित केले आहे. बुद्ध प्रतिमेला केवळ गतिमान व पोकळ अशा पट्ट्यांच्या वेढ्यातून साकारणे व बुद्धाच्या सत्याच्या साक्षात्काराने स्वयंप्रकाशित अशा त्या  अवस्थेला दाखवण्याकरता त्या पोकळ शिल्पात आतून एका ज्योतीची रचना करणे हि संकल्पनाच अतिशय प्रभावी अशी होती.
भारतातले अनेक कलावंत हे भाऊंचे मित्र आणि चाहते आहेत. कारण विविध कलांमधील साम्यस्थळ भाऊ जाणतात  आणि त्यामुळे कलानिर्मितीसंबंधी विचार करणेत्यावर चर्चा करणे यात ते रमतात. कुमारजी, भीमसेनजी, बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे, श्रीराम लागू अशा विविध क्षेत्रातील नामवंत श्रेष्ठींशी त्यांचा दाट परिचय. वाचन आणि संगीत श्रवणाची आवड याने ते एक परिपूर्ण असे कलावंत आहेत. एकाच वेळी सृजन आणि त्यामागची निर्मिती प्रक्रिया जाणणारेशिल्पनिर्मितीच्या तंत्रावर प्रभुत्व असलेले आणि या निर्मितीबद्दल लेखन आणि विवेचन करू शकणारे शिल्पकार अगदी अपवादात्मक असणार. भाऊ हे असेच अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आकार या पुस्तकाने आणि त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख हेच सिद्ध करतात. सध्या ते शिल्पकलेतील सौदर्य शास्त्र या विषयावर लेखन करत आहेत.
त्यांनी केलेल्या असंख्य पुतळ्यांना बघितल्यावर जाणवतो तो त्यांचा त्यामागील प्रचंड अभ्यास व कामातील दुर्दम्य  उत्साह. त्यांच्या व्यावसायिक जीवनाचा प्रवास असंख्य चढउतारावरून गेलाय. परंतु कोणत्याही परिस्थितीस  ते तितक्याच उत्साहाने व जिद्दीने सामोरे गेले. हीच जिद्द व चिकाटी त्यांच्या यशाचे गमक आहे. कामाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड कधी त्यांनी केली नाही. हे व अशा तऱ्हेच्या अनेक अनुभवांची शिदोरी त्यांनी आम्हाला दिली आहे.
घरात आईला मी चित्रे रंगवताना पाहत मोठी झाले. त्यामुळे कलाविश्वाशी माझी पहिली ओळख आईनेच करून दिली. शाळेत हि चित्रकलेचाच परिचय मुलांना होतो. शिल्पकला ही पुढची पायरी असते . आईच्या मार्गदर्शनात शालेय जीवनात खूप चित्रे मी काढली व अनेक स्पर्धातून बक्षिसे हि मिळविली. आणि साहजिकच पुढे चित्रकलेचेच शिक्षण घ्यायचे असे ठरवले. त्याप्रमाणे बडोद्याच्या आर्ट स्कूल मध्ये प्रवेशही घेतला. तेथील पहिल्या २ वर्षांच्या अभ्यास क्रमात चित्रकलेबरोबर शिल्पकलाही शिकायला मिळाली. तोवर मी स्वतः कधी मातीत हातही घातला नव्हता. पण त्या २ वर्षात शिल्पकलेत अशी काही रुची निर्माण झाली कि मी चित्रकलेऐवजी शिल्पकलेचाच अभ्यासक्रम पूर्ण केला. त्रिमिती हा शिल्पकलेचा गुण हा कला निर्मितीला एक वेगळीच व्याख्या देतो हे मी जाणले आणि शिल्पकलेच्या प्रेमात पडले.    
शिल्पांचे धातूत ओतकाम करण्यासाठी सुरुवातीच्या काळात भाऊंना दुसर्यांच्या फौंड्री वर विसंबून राहावे लागे परंतु त्यात वेळ खूप खर्च होई. पुन्हा ते मनासारखे न झाल्यास मनस्ताप होई तो वेगळाच . भाऊंनी या सर्व अडचणींवर मात करत शिल्पासाठी धातूचे ओतकाम करण्यासाठी स्वतःची फौंड्री ७० च्या दशकात उभी केली. आज त्यांची सर्वतर्हेने परिपूर्ण अशी फौंड्री इतकी वर्षे शिल्पान्बरोबरच औद्योगिक कास्टिंग चे काम चोख पणे करत आहे. खरे म्हणजे शून्यातूनच त्यांनी हे विश्व निर्माण केले आहे. अर्थातच प्रत्यक्ष शिल्प निर्माण करताना त्यांना अनेक धोके पत्करावे लागले आहेत. पण प्रत्येक विषयाच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची त्यांची मनोवृत्ती असल्यामुळे प्रत्येकवेळी ते यशस्वी ठरले आहेत. मॉडेल तयार करणे त्यावरून पूर्णाकृती पुतळा साकारणे, कास्टिंग ची नवी नवी तंत्रे हाताळणे आणि शेवटी तो पुतळा जागेवर उभा करणे या प्रत्येक प्रसंगी त्यांनी आव्हान स्वीकारले. त्यांच्या प्रत्येक स्मारक शिल्पाचा वेगळा किस्सा आहे. हि सर्व माहिती ते रंगून विस्ताराने सांगतात.
शिल्पकला शिल्पतंत्र याबरोबरच ज्या व्यक्तीचे शिल्प तयार करायचे त्याचा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय भाऊ  कामाला हात घालत नाहीत. छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा करायचा तर त्या कालखंडाच्या अभ्यासात ते महिन्यामागून महिने घालवत. आसाममधल्या वीरांचे पुतळे करायचे असले तर आसामला त्यांच्या असंख्य  वाऱ्या होत . पंडित नेहरूंचे शिल्प दगडातून उभे करायचे तर योग्य तो दगड देशाच्या कुठल्या भागात आहे ते पाहण्यासाठी त्यांनी देशभर दौरा केला . त्यांनी कै. रामभाऊ म्हाळगींचा पुतळा केला तेव्हा त्यांना त्या पुतळ्यासाठी योग्य असे छायाचित्र मिळेपर्यंत त्यांनी कामाला हात घातला नाही. अखेर फोटो मिळाला. यानंतर त्यांचे काम अक्षरशः एका दिवसात झाले.
या अभ्यासू वृत्तीचा आणखी एक फायदा असा होतो कि त्यांच्या पुतळ्यात त्या त्या व्यक्तीचे नेमके व्यक्तिमत्व उभे राहते. दिल्लीत शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना त्यांनी मुत्सद्दी योध्याचा पुतळा तयार केला आणि त्यामुळे शिवाजीच्या हातात तलवार दिली नाही तर प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या मुरारबाजीच्या मात्र दोन्ही हातात तलवारी दिल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरच मूर्तिमंत लढवय्याचा आवेश दाखवला.
व्यावसायिक चढाओढसंबंधितांचे हेवेदावेमत्सर यांना तोंड देत तसेच व्यवहार पाहताना कलेशी तडजोड होऊ न देण्याचे ब्रीद जोपाशित त्यांची यशाची कमान चढतच गेली.
मुंबईतील गेट वे समोरचा शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळाइंदूर येथील छत्रपतींचा अश्वारूढ पुतळाग्वाल्हेरचा व दिल्ली  येथील स्वा. सावरकरांचा पुतळापुरंदर येथील मुरारबाजींचा पुतळादिल्लीचा छत्रपतींचा पुतळाग्वाल्हेर मधील मर्दानी झाशीच्या राणीचा पुतळादिल्लीतील नेताजींचा पुतळाआसाममधील अश्वारूढ शिलारायउभा लासित बारफुकन यांचे पुतळे हे भाऊंच्या कलेचे देशभरातील काही कीर्तीस्तंभ.
त्यांनी केलेले गांधी पुतळे ,
(टाऊन हॉल) दिल्ली मीरतग्वाल्हेर वर्धा, नागपूर ;( दांडी गुजरातजळगाव पुणेभारतातील अनेक आन्तर्राष्ट्रीय शाळा येथे भारतात तर , तिबेटभूतान जपान (येथे संगमरवरी) ;  सिंगापूर मलेशिया बंग्कॉक(ऑस्लो) नॉर्वे (रोम) इटली दुबई, या  भारताबाहेरील देशातही  भाऊंचे गांधी पुतळे आहेत. लंडन येथे प्रिन्स फिलीप चे हेड करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. त्याच प्रमाणे लंडन मध्ये जाऊन त्यांनी लॉर्ड माउंट बॅटनचा हि पुतळा तयार केला.
भाऊंनी केलेले शिवाजी महाराजांचे पुतळे ;
गेटवे ऑफ इंडियामुंबई तिकोना पार्क नवी दिल्ली औरंगाबाद, क्रांती चौकनागपूर इंदूर व ग्वाल्हेर या शहरातून बसवले आहेत व ते सर्वच अश्वारूढ शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत व सर्वच १५ फुटाहून अधिक उंचीचे आहेत.
तिलक ब्रिज नवी दिल्ली येथील लोकमान्य टिळकांचा पुतळा.
मुंबईत  बॉम्बे हाय कोर्ट येथील श्री एम.सी. छागला यांचा पुतळा.
इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसहेग ( नेदरलँड्स) येथील डॉ नागेंद्र सिंग यांचा अर्ध पुतळा.
या शिवाय अटलजीजे.पी नारायणलालबहादूर शास्त्रीयशवंतराव चव्हाणनेहरूइंदिराजीसर्वपल्ली राधा कृष्णनडीन दयाळ उपाध्यायडॉ विक्रम साराभाईबॅरिस्टर रजनी पटेलअशा अनेक मान्यवरांचे त्यांनी केलेले अर्धपुतळे यामुळे त्यांचा या सर्व मान्यवरांशी संपर्क आला व त्यांना त्यांच्या कामामुळे मान सम्मान मिळाला.
कलेचा इतिहास जाणणेदेशोदेशीच्या सुप्रसिद्ध कलाकृती पाहणे हि कोणत्याही कलाकाराकरता एक पर्वणीच असते. भाऊंनी देखील अनेक देशांचा दौरा केला.. अमेरिकारशियाफ्रांस,नेदरलंड, इटलीस्वित्झर्लंड अशा अनेक देश त्यांनी पहिले आणि तेथील संग्रहालायाना भेट दिलीपरदेश भ्रमणातही त्यांनी परदेशी कलेचा, तंत्राचा अभ्यास केला व आपली कला समृद्ध केली. सतत नवनवे प्रयोग करून ते आपल्या कलेत विविधता आणायच्या प्रयत्नात असतात.
शिल्पकलेच्या या प्रवासात त्यांना आलेले अनुभव त्यांनी त्यांच्या आकार या पुस्तकात खूप विस्ताराने मांडले आहेत.
मायकेलएंजेलोबर्नीनीयांजबरोबर अलिकडच्या काळातील रोदां हा त्यांचा आवडता शिल्पकार. आईच्या प्रत्येक चित्राचे ते रसिकतेने रसग्रहण करत. तिच्या चित्र प्रदर्शनांना त्यांचा पूर्ण सहभाग असे. लग्न झाले तेव्हा आईचे कला शिक्षण अर्धेच राहिले होते. भाऊंच्या प्रोत्साहनाने तिने तिचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
मात्र या श्रेष्ठ शिल्पकाराला एक खंत आहे. ती म्हणजे त्यांच्या मते अमूर्त शिल्पाच्या निर्मितीची फारशी संधी त्यांना मिळाली नाही. गौतम बुद्धपंडित नेहरूस्वामी विवेकानंद अशा कितीतरी अमूर्त स्मारक योजना पुऱ्या तरी झाल्या नाहीत किंवा त्यांच्या प्रतिभेची झेप निर्णय करणाऱ्यांना झेपली नाही. परंतु मला खात्री आहे कि आज ना उद्या ही संकल्प चित्रे प्रत्यक्षात येतील. हा आशावाद उगीच निर्माण झालेला नाही. भाउंच्या अनेक संकल्पनांना दाद देणाऱ्या व्यक्ती त्यांना आयुष्यात भेटल्या आहेत. कै. यशवंतराव चव्हाणपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीकै. इंदिरा गांधीकै. रजनी पटेल अशा अनेक व्यक्तींनी त्या त्या काळात त्यांची पाठराखण केली आहे.
भाऊंच्या शिल्पकलेतील कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील काही महत्वपूर्ण पुरस्कार :
कल्याण गौरव पुरस्कार ;
कल्याण जनता सहकारी बँकेचा पुरस्कार ;
कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा गोदा गौरव पुरस्कार (२००४ साली);
याज्ञवल्क्य संस्थेतर्फे याज्ञवल्क्य पुरस्कार (२००७ साली) ;
दी आर्ट सोसायटी ऑफ ईंडिया अवॉर्ड (२००९ साली) ;
दी बॉंबे आर्ट सोसायटी अवॉर्ड (२००९ साली) ;
कल्याण भूषण पुरस्कार (२०१० साली) ;
लंडनच्या बकिंगहॅम पॅलेस मध्यें प्रिंस फिलिप यांचा पुतळा करण्या करता १९७३ साली त्यांना आमंत्रित केले गेले.
१९५८ साली स्पेन ची स्कॉलरशिप त्यांना मिळाली होती. भारतीय डेलिगेट या नात्याने १९७२मध्ये रशिया ला त्यांनी भेट दिली.ऑल ईंडिया स्क्ल्पटर्स असोसिएशन चे ते फाऊंडर मेम्बर आहेत. त्यांनी त्यांच्या कलाकृतींची फारशी प्रदर्शनं दिल्ली मुंबई लंडन, मॉस्को हेग व न्यूयॉर्क या शहरातून केली. व त्यांच्या कलाकृती राष्ट्रीय कला प्रदर्शनी ललित कला नवी दिल्ली व राज्य कला प्रदर्शनमुंबईयेथे प्रदर्शित करण्यात आल्या.
त्यांनी कला परीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनबॉम्बे आर्ट सोसायटी कला प्रदर्शन व मुंबई विद्यापीठाचे कला परीक्षेचे परीक्षक म्हणून कार्य केले.
या शिवाय ते पंडित नेहरू स्मारकासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धेत व इंदिरा गांधी स्मारकासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील विजयाचे मानकरी ठरले.
प्रशासनाद्वारे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे ते nominated विश्वस्त आहेत.
यापुढे हि जाणकार व्यक्ती त्यांच्या कलेला जाणून त्याचा उचित सन्मान करतील असा मला विश्वास वाटतो.
पराकोटीचे व्यावसायिक असूनही आमचे भाऊ अतिशय दिलदार व मोकळ्या मनाचे आहेत. त्यांचे आम्हा सर्वांवर अतिशय प्रेम आहे. नात्यातील सर्व मुलांचे ते अतिशय लाडके काका आहेत. त्यांना शास्त्रीय संगीताची व बागकामाची खूप आवड आहे. रोज आपल्या छोटयाशा बगीच्यात ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. संगीताच्या आवडीमुळे संगीताच्या ध्वनिफितींचा मोठा संग्रह त्यांनी केला आहे. भाऊंनी या त्यांच्या कला प्रवासावर आकार हे पुस्तक लिहिले व त्यात या प्रत्येक शिल्पाच्या निर्मितीत त्यांच्या कर्तुत्वाला, ‘जिच्या असण्यामुळेच जगण्याला सुंदर आकार आला’ या शब्दात भाऊंनी जिचा उल्लेख केला आहे त्या माझ्या आईचा भाऊंच्या कलाविश्वातील यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा आहे.
त्यांचे कुटुंबातील सर्वांशी असलेले ममत्वाचे नातेकल्याणच्या गायन समाज आणि Citizen Council च्या सभासदांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अनुकरणीय आहेत . ही Towering Personality आहेपरंतु त्यांचा मोठेपणा कोणाला कधी बोचत नाही. ते स्वाभिमानी आहेत पण अहंकारी नाहीत. त्यामुळेत्यांच्या मोठेपणाचा प्रत्यय येत असतानाच तो असह्य होत नाही. आमचे भाऊ कर्तुत्वाने आभाळाएव्हढे आहेत. आईच्या साथीने त्यांनी यशाची शिखरे गाठली.  आई सारख्या तोडीसतोड कलावंताची साथसंगत भाऊना मिळाली. एकमेकांच्या योग्य व प्रेरक साथीने त्या  दोघांची कला फुलत गेली , बहरत गेली, विकसत गेली. एकमेकांना सर्वार्थाने पूरक अशी हि दोन व्यक्तिमत्व दैव योगाने एकत्र आली आणि आयुष्याची जवळपास ६० वर्ष त्यांनी एकत्र वाटचाल केली. २ वर्षापूर्वी आईच्या अकस्मात निधनाने त्यांना हेलावून सोडले . पण आता ते तिच्या आठवणीना उजाळा देत तिने अर्धवट सोडलेली चित्रे पूर्ण करण्यात स्वतःला रमवतात.नुकतीच त्यांनी वयाची नव्वदी पूर्ण केली . व याही वयात त्यांनी अजून एका  गांधी पुतळ्याचे काम पूर्ण केले. हा गांधींचा पुतळा दांडी येथे बसायचा आहे. दुर्दम्य उत्साह आणि सृजनतेचा स्रोत असलेले आमचे भाऊ आमच्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहेत . कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता त्यांनी सर्व अडचणीवर सदैव मात केली, त्यांचे पुस्तक आकार हे त्यांच्या या सर्व लढ्याचे पुरावे देते. त्यांची कारकीर्द हि मला माझ्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे देत आली आहे. एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे ते सतत माझ्या पाठीशी आहेत हि मला खात्री आहे. अफाट अशा या कर्तृत्वाचे मानकरी आमचे भाऊ त्यांच्या कारकीर्दीचा आलेख समजायला आणि तो शब्दात मांडायला मी घेतला खरा पण तो अपूर्णच आहे.
मी मनापासून देवाकडे त्यांच्यासाठी उदंड व आरोग्यपूर्ण अशा दीर्घायुष्याची याचना करते व त्यंचे प्रेममय छत्र आमच्यावर असेच अनंत काळ राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.
पुत्राश्च विविधैः शीलैर्नियोज्याः सततं बुधैः, नीतिज्ञाः शीलसम्पन्ना: भवन्ति कुलपूजिताः