Wednesday 30 September 2020

Nirmala Mone

 निर्मला मोनेः एक चौफेर व्यक्तिमत्व 


निर्मला मोने हे नाव मुंबई आणि पुणेकरांना अनोळखी असणारच नाही.

हे नाव मराठी माणसाच्या अनेक आठवणी जाग्या करेल. शिक्षिका निर्मला ताईंच्या अनेक विद्यार्थीनींना त्यांची शाळा आणि मोने बाई आठवतील. सर्व सामान्य मराठी माणसाशी त्या रोजच्या वृत्त पत्रातून, मासिकातून छापून येणाऱ्या त्यांच्या विविध विषयांवरील लेखातून वरचेवर भेटत. याशिवाय त्यांच्या नावे असलेल्या अनेक पुस्तकांमुळे एक उत्तम लेखिका म्हणून ही त्यांची ओळख आहेच. विपुल बाल साहित्य आणि अनेक विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखन असलेली त्यांची पुस्तकं कित्येकांच्या संग्रही देखील असतील.

त्यांचा जन्म मुंबईचा.

गेल्या शतकातील भारतीय चित्रकलेतील जे एक थोर व्यक्तिमत्व, महानतम चित्रकारांचे जे गुरु, त्या चित्रकार कृष्णराव केतकर यांची ती ज्येष्ठ कन्या,

निर्मला. २९ सप्टेंबर १९३५ रोजी मुंबईतील गिरगाव येथे त्यांचा चा जन्म झाला. वडील थोर चित्रकार, तर आई कलावती कृष्णराव केतकर, शिक्षिका होती. आईकडून बुद्धीचे तेज आणि अभ्यासू वृत्ती त्यांना मिळाली.. १९५० साली चांगले गुण मिळवून त्या मॅट्रिक झाल्या आणि मग शिक्षणाच्या वाटा त्यांना खुणावू लागल्या. त्यांना खूप शिकायचे होते. खूप काही करायचे होते. आणि त्या शिकल्या. आईच्या प्रोत्साहनाने निर्मलाताई मराठी व संस्कृत या दोन्ही विषयात एम. ए. पर्यन्त शिकल्या. याशिवाय हिन्दी राष्ट्रभाषा कोविद , साहित्य विशारद, गीताविद असे शिक्षण ही त्यांनी संपादिले व त्या वेळचे बी टी, जे अध्यापनासाठी आवश्यक होते ते ही त्यांनी केले. शिक्षिका म्हणून पहिले पाऊल दादर येथील छबिलदास गर्ल्स हाय स्कूल मध्ये ठेवले. नंतर विले पार्ले येथील महिला संघ विद्यालयात निर्मला ताईंनी अध्यापनाचे कार्य केले.

याच सुमारास जानेवारी १९५६ साली त्यांनी हुशार व सुस्वरूप श्री माधव मोने यांच्याशी विवाह बंध जोडला. पूर्वाश्रमीची निर्मला केतकर आता निर्मला माधव मोने झाली.

मुंबईत असताना त्या आकाशवाणी च्या मुंबई केंद्रावर बातम्यांचे निवेदन करीत

असत. सकाळी सातच्या बातम्या अनेक वर्ष त्यांच्या आवाजात मुंबईकरानी ऐकल्या आहेत.

मुंबईत असताना मुंबई दूरदर्शन वर ही काम करण्याचा त्यांना योग आला. मुंबई दूरदर्शन वरील अनेक कार्यक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग असे. श्रीमती सुहासिनी मुळगावकर व विजया धुमाळे यांच्या बरोबर त्यांच्या दूरदर्शन वरील “सुंदर माझं घर”, “प्रतिभा आणि प्रतिमा” व मुलांसाठी प्रसारित होणाऱ्या या “किलबिल”  कार्यक्रमांच्या निर्मितित निर्मला मोने सक्रिय होत्या. मुलखावेगळी माणसं सारख्या कार्यक्रमांत अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा अनेक मान्यवरांशी स्नेहबंध जुळला.

वडिलांकडून संगीताबरोबर अभिनयाचा ही वारसा त्यांना लाभला. १९५० ते १९६० या दशकात अनेक मराठी नाटकात त्यांनी अभिनय केला होता. उदाहरणार्थ

पु. ल. देशपांडे लिखित “अंमलदार” या नाटकात त्यांनी नायक पु. लं. च्या नायिकेची भूमिका केली होती. याशिवाय “तुझं माझं जमेना”, आणि अशा अनेक नाटकातून त्यांना अभिनयाची संधि मिळाली.

त्या हिन्दी सिने संगीतात लता मंगेशकर सारख्या दिग्गज गायिकांबरोबर कोरस मध्ये ही गात.

पुढे १९७९ साली पुण्यास स्थलांतरित झाल्यावर त्या मॉडर्न कॉलेज मध्ये प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात त्यांच्यातील लेखिका बहरून आली. गर्गशा या टोपणनावाने त्या लेखन करीत. मराठी तील लेखनाबरोबरच, इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असल्याने अनेक इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला.

नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया ने प्रकाशित केलेल्या “नेताजी सुभाष चंद्र बोस” या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद;

मेहता पब्लिशिंग हाऊस साठी त्यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकांपैकी ही काही ठळक उदाहरणे. “मोहनदास; व्यक्ति, त्यांची माणसं आणि साम्राज्य”.  “साम्राज्याचा पाडाव-मिडवेची लढाई” , “द पेज 3 मर्डर्स”

रेई कीमुरा लिखित जॅपनीज मॅग्नोलिया, या वेगळ्या विषया वरच्या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी खूप सुंदर रित्या केला.

 

बाल साहित्यात तर त्यांनी स्वतःचा वेगळाच ठसा उमटवला . त्यापैकी शामु ही बाल कादंबरी , जंगल जंमत मालिकेतील 7 पुस्तके विशेष उल्लेखनीय. या शिवाय सोनेरी चोच आणि जंमत गोष्टीगाढवाचं गाणं आणि जंमत गोष्टीजादूचा रबर आणि गडबड गोष्टी , शेरूपिंटू पेलीकन आणि जंमत गोष्टीपऱ्यावरणाची ओळख, अशी अनेक पुस्तके त्यांनी बालवाचकांसाठी लिहिली. त्यांच्या बाहुलीच घर या पुस्तकाला २००३ साली बालवाङमय पुरस्कार मिळाला.  “माणसातील माणसं” या त्याच्या व्यक्ति चित्र संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद.पुणे. चे पारितोषिक 2002 साली मिळाले होते.  

कुक्कु इन द क्लॉकएन्चॅंटेड विलोज क्रिटिकल मास , जॅपनीज मॅग्नोलिया”  द क्वेस्चन ऑफ फेथ ही काही विशेष विषयांवरील पुस्तकं त्यांनी लिहिली. “महाभारतातील 3 नायिका” व “पंचकन्या” असे विविध विषयांवर त्यांनी लेखन केलं. बालपणीच्या आठवणीवरील “घर कौलारू” हे असेच एक सुंदर पुस्तक.

अंतर्नाद, धर्मयुग सारख्या बऱ्याच आघाडीच्या  साप्ताहिक व मासिक पत्रिकांमधून त्यांच्या कथा, लेख प्रकाशित होत. तरुण भारत या वृत्तपत्राच्या रविवार पुरवणी ची संपादिका म्हणून 1996 साली त्यांची नियुक्ती झाली होती

 

त्यांच्या अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती व निसर्ग प्रेमामुळे त्यांनी वृक्ष जीवनात ऋतुचक्राप्रमाणे घडणाऱ्या बदलांचे बारकाईने निरीक्षण केले. पानाफुलांचा, वनस्पतींचा खोल  अभ्यास केला आणि “फुलले ऋतु” हे पुस्तक लिहिले. वनस्पतींचा आरोग्यासाठीच्या उपयोगावर त्यांनी पुस्तकं लिहिली. दैनंदिन आहारात या वनौषधीचा उपयोग यावर त्या व्याख्यान देत. बेनिफिट्स ऑफ वनस्पति, आणि रेसिपीज ऑफ हेल्दी ईटिंग असे विषय घेऊन त्यानी अमेरिकेच्या वारीत प्रात्यक्षिकासह व्याख्यान ही दिलं.

गद्य लेखनाबरोबर काव्य लेखन ही त्यांनी केलं. १९६२ च्या चीनयुद्ध प्रसंगी त्यांनी लिहिलेलं हिमालयाची शपथ हे समर गीत शाळांतून गायलं जात असे .

त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असे कितीतरी पैलू आहेत.

निर्मला मोने यांची मी भाची. तिची मुलंसुना, नातवंड आणि परिवारातील आम्हा सर्वांच्या मनांत तिच्या आठवणी सदैव ताज्या राहतील आणि तिचे कर्तृत्व नेहमीच आमच्यासाठी प्रेरक ठरेल. या माझ्या ताई मावशीला आमचा सर्वांचा नमस्कार ..

मावशी, तुझ्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईषचरणी प्रार्थना ..

लेखिका

सौ. अल्पना लेले 

    Same portrait, different angle*


लहान पणा पासून ताई मावशी आठवते ती नेहमी नीटनेटकी. कधी इकडचे केस तिकडे नाही, कायम साडी, क्वचित पंजाबी ड्रेस मध्ये फोटो असेल तर फोटोपुरताच घातला असेल. आणि साड्यासुद्धा काही भर्जरी नाहीत पण ताईमावशी मला नेहमीच टेचात दिसायची. जबरदस्त आत्मविश्वास!!

आम्ही गिरगावच्या चाळीतून पार्ल्याच्या बंगल्यात आलो की ऐसपैस वाटायचं. पण तेव्हाचं बॅंक ॲाफ इंडीयाच्या काॅलनीतल घर अजूनच पाॅष दिसायचं. Crisp बांधकाम, block system, रविवार दुपारचा मैलूचा खिमा, त्या बरोबर beer चा ग्लास. त्यानंतर रेडीओ वर नाट्यसंगीत ऐकत बसलेले बाबा-ताईमावशीला बघताना ते एक दुसरचं जग वाटायचं. त्या दोघांच्या personalityला त्यापेक्षा कमी काही चाललंच नसतं.

त्यानंतर भेट थेट पुण्याला १९८१ मधे सेवन लव्हजच्या घरात.

पण ताईमावशीची खरी ओळखं पुण्याला १९८३ साली इंजिनीअरींगला गेल्यानंतर. दिवाळीची मासिकं जास्त जवळची झाली कारण त्यात ताईमावशीचे लेख असायचे. दुसर्यांचे लेखही परके नसायचे कारण त्या सर्व लेखकांचा घरी एकेरीत उल्लेख असायचा. वपु, शैलजा राजे, मतकरी म्हणजे सगळी आपलीच मंडळी. एकदाही न भेटता सुलभाताई देशपांडेची सुलूमावशी झाली. शैलजा राजेच्या मुलाचा इंजिनीअरींग टूल सेट घ्यायला तिच्या घरी जाऊन आलो. पुण्यातच त्यामुळे मराठी वाचायची आवड लागली. एक दिवस ताईमावशीनी “एक दिवा विझताना” हे रत्नाकर मतकरींचं पुस्तक वाचायला सांगीतलं. जवळजवळ बाबांचीच गोष्ट आणि ताईमावशीने सुद्धा तशीच लिहीली असती. मतकऱ्यांची पुढे सगळी पुस्तकं वाचून झाली पण ही गोष्टं घर करुन गेली. आनंद पिक्चर मधे glamorize केलेला लूकेमिआ फक्त लांबूनच बघावा.

ताईमावशीचा स्वयंपाक वेगळाच असायचा. मेधाला तिची आठवण म्हणजे तिच्या healthy eating recipes. सेंट लुइसला बरीच जण आली होती तिला ऐकण्यासाठी आमच्याकडे.

एक दिवस दिड तास भात का होत नाही ह्याचे कारण वाचायच्या नादात गॅस लावलाच नाही हे admit करताना जरी खळखळून स्वत:वरचं हसली तरी व्याकरणमधल्या चुकांना माफी नाही. देवांने वरुन निर्मला मोनेंना नेण्याचे फर्मान काढताना दोन वेळा “नि” ऱ्हस्व आहे ह्याची खात्री केली असेल नाहीतर त्या दूताची “लाज वाटत नाही का?” म्हणून तासली असती तिने.

ताईमावशी म्हटलं की असं तिचं portrait डोळ्यांसमोर उभ रहातं. आणि अनेक टप्प्यात त्या portrait मध्ये तसा फरक नाही जाणवत.

ॲागस्ट १९८५ साली बाबा गेले. ताईमावशी तेव्हा ५० वर्षांची होती. बाबांनी ४ वर्षे (१९८१-८५) Leukemia शी लढत काढली आणि ताईमावशीनी त्यांच्या बरोबर. १९८३ ला मी पुण्याला तिच्याकडे पहिल्यांदा राहिला गेलो, probably तिच्या मानसिक रित्या सगळ्यात कठीण काळात.

आज मेधा आणि मी exactly १९८५ मधल्या बाबा-ताईमावशीच्या वयाचे आहोत. परत वळून बघताना तेच अगदी जवळून पाहीलेलं portrait मात्र आता या angle नी वेगळच दिसतं.

🙏🙏🙏

- शिरीष 

 



   




Nayana Chouhan