Saturday 5 November 2016




माझी आई .. नेत्रासाठे.. 

एक अफलातून  स्त्री.....
एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व .......
सौंदर्यवती, विश्व विख्यात चित्रकर्ती, सर्व कलांत आपला ठसा उमटवणारी अशी कलावती, गायिका, लेखिका, कवयित्री, नृत्य निपुण, अभिनेत्री, दिग्दर्शिका, उत्तम गृहिणी, पत्नी, माता... विशेषणांची यादी लांबच लांब आहे ..... छे, खरं तर सर्व गुण संपन्न अशी माझी आई ......

सौ. नेत्रा सदाशिव साठे.

प्रसिद्ध चित्रकार कृष्णराव केतकर यांची ती सुकन्या. लहानपणापासून संगीत व चित्रकलेच्या वातावरणारत रमली वाढली. वडिलांकडून चित्रकला , गायन  व अभिनयाचे धडे घेत ती लहानाची मोठी झाली. लग्न झाले ते ही एका शिल्पाकाराशी.

शिल्पकार सदाशिव (भाऊ) साठे ...

आमचे भाऊ हे जागतिक कीर्तीचे शिल्पकार .... त्या दोघांच्या एकत्र येण्याने आम्ही भावंड कलेचा वारसा घेउन जन्मलो आणि कलात्मक वातावरणात वाढलो . आमचे लहानपण या दोघांच्या कलात्मक सहजीवनाच्या छायेत सर्व तर्हेने परिपूर्ण होत गेलं.

वडील स्मारक शिल्पांचे शिल्पकार .... शिल्पकृतींची सरकारी कामे मिळवण्याच्या दृष्टीने दिल्लीत राहणे त्यांच्यासाठी गरजेचे होते. शिल्पकार वडिलांचा स्टूडीओ व foundry कल्याणडोंबिवली औद्यॊगिक वसाहतीत असले तरी त्यांनी संसार दिल्लीतच मांडला होता. कामानिमित्त ते सतत दिल्ली, मुंबई अशा वाऱ्या करत. त्यामुळे माझ्या बालपणीच्या आठवणी केवळ आईच्या भोवतीच गुंफलेल्या आहेत. दिल्लीतील लहानपण हे आम्हा दोघा भावंडांसाठी आठवणींचा अनमोल ठेवा आहे. आम्हा दोघा भावंडाना घेऊन ती इतक्या लहान वयात, एकटी दिल्लीत किती हिंमतीने राहिली असेल. आता विचार केल्यावर कळते, तिच्या सारख्या सुंदर तरुण स्त्रीने दिल्ली सारख्या ठिकाणी एकटीने राहणे किती धाडसाचे होते तॆ.

बांगलादेश युद्धाच्या वेळी दिल्लीतील भीतीदायक वातावरणात आम्हा दोघांवर भीतीचे थोडेही सावट पडू न देता ती कशी राहिली असेल...?

दिल्लीत असतानाचा एक प्रसंग .. आम्ही त्यावेळेस चीन युद्धा मुळे वर्षभर कल्याणला राहून परत दिल्लीत आलो होतो. आमच्यासाठी शाळेत दाखला घ्यायला आई, एका नावाजलेल्या आणि घरापासून फार लांब नसलेल्या अशा शाळेत आम्हाला घेऊन गेली. आम्ही दोघे वर्षभर मराठी शाळेत होतो तेही प्राथमिक शाळेत जिथे एकाच भाषेत शिक्षण दिलं जातं हिंदी व इंग्रजी भाषा ५ व्या इयत्तेपर्यंत महाराष्ट्रात शिकवल्या जात नाहीत, त्यामुळे आम्हाला शाळेत दाखला घेताना भाषेची समस्या निर्माण झाली होती. त्यावर तिथल्या मुख्याध्यापकांनी एक अजब तोडगा काढला. त्यांनी आईची चित्र तिच्या चित्र प्रदर्शनात पाहिलेली होती. आणि त्यांना तिची चित्र शैली फारच आवडली होती. त्यांनी आम्हाला शाळेत दाखला हवा असल्यास आईने शाळेत चित्रकला शिकवावी अशी अट घातली. अशा रीतीने तिने ती अट स्वीकारल्यावरच आम्हाला त्या नावाजलेल्या शाळेत दाखला मिळाला. तिच्या सुंदर चित्रांमुळे आम्हाला चांगल्या शाळेत दाखला मिळाला.

गृहिणीपदाची सर्व कर्तव्ये पार पडताना ती आमची आई, मैत्रीण, गुरु सर्व काही होती...तिने आम्हाला संगीत, नाट्य, नृत्य, काव्य, साहित्य या सर्वांची गोडी लावलीच, त्याच बरोबर आमच्यावर चांगले संस्कार ही घडवले. त्या काळात ती गाडी चालवत दिल्लीभर आम्हाला घेऊन फिरे . सिनेमा, गझल अशा कितीतरी कार्यक्रमाना आम्ही जात असू. दिल्लीतील लहानपणीचे ते रम्य दिवस... हृदयाच्या कप्प्यात मी जपून ठेवलेला एक अनमोल खजिना आहे.

लग्न झाल्यावर १९५६ मध्ये आई ने दिल्लीत पाय ठेवला. तोपर्यंत मुंबईच्या बाहेरही ती फारशी गेली नव्हती. १९ व्या वर्षी लग्न झालेलं. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात ती नक्कीच बावरली असणार. पण तिने तिथेही जुळवून घेतलं इतकंच नाही तर तिथे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला खुलवल आणि स्वतःच असं एक स्थान निर्माण केलं.

त्याकाळी दिल्लीतील मराठी लोक महाराष्ट्रापासून लांब आल्याने जमेल तेवढे मराठीपण जपत असत. मराठी चित्रपट, व्यावसायिक नाटके दिल्लीत अभावानेच येत. आणि आईला तर नाटक, सिनेमा, संगीत व नृत्य या सर्वांचे वेड होते. मुंबईत मराठी, संस्कृत नाटकांतून अभिनय ती करत असे. माझ्या आजोबांच्या मागे बसून त्यांच्या संगीत मैफिलीत त्यांना साथ करत असे. मग दिल्लीत ती स्वस्थ कशी बसणार?
आमच्या संगोपानाबारोबरच तिने स्वतः च्या कलागुणांना ही जपले हे विशेष. ती लग्नाआधी मुंबईत असताना संस्कृत नाटकातून अभिनय करत असे .... अभिज्ञानं शाकुंतलंमृत्च्छ्कटीकमं  या नाटकातून तिने प्रियंवदा व मदनिकेच्या भूमिका केल्या होत्या. दाजी भाटवडेकरांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय करायचे भाग्य तिला लाभले. नायिकेच्या नसल्या तरी तिच्या भूमिकेची, रुपाची, अभिनय कौशल्याची तत्कालीन वृत्तपत्रातून विशेष दखल घेतली गेली होती.

लग्नानंतर दिल्लीत आल्यावर तिने महाराष्ट्र मंडळात स्वतः ची विशेष ओळख तयार केली. 

तिने नाटकं लिहिली, नाटकं बसवली आणि नाटकातून कामे ही केली. तिने लिहिलेल्या एकांकिकेतील 

एक बिचारी व्यथा”  ही विनोदी एकांकिका विशेष गाजली तर " नियती" ह्या अतिशय गंभीर 

विषयावरच्या एकांकिकेला स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. याच एकांकिकेतील तिने स्वतः केलेल्या

भूमिकेसाठी तिला अभिनायाचेही पारितोषिक मिळाले. 


उषास्वप्न नावाची नृत्य नाटिका तिने बसवली. त्यात तिने प्रमुख भूमिका हि केली. याशिवाय अनेक 
संगीत व नृत्याच्या  कार्यक्रमांची तिने दिल्लीकरांना मेजवानी दिली. दिल्ली महाराष्ट्र मंडळाचे 
गणेशोत्सव तर तिच्या कार्यक्रमांशिवाय पारच पडत नसत.

या शिवाय तिने गणेशोत्सवासाठी अनेक सृजनात्मक कार्यक्रमांची निर्मिती करून दिल्लीतील मराठी 

मनात एक मानाचे व कौतुकाचे स्थान बनवले होते. आजही बरीच मंडळी त्या कार्यक्रमांची व पर्यायाने

साठे बाईंची आठवण काढतात. तिने लिहिलेली सौभद्र कल्लोळ”  ही दोन संगीत नाटकांच्या पदांवर 

( संगीत सौभद्र व संशय कल्लोळ ) आधारित एकांकिका विशेष गाजली होती... मुलांसाठी लिहिलेली 

ही नाटिका त्यातील नाट्य गीतांच्या आवडीमुळे मराठी दिल्लीकरांनी उचलून धरली होती व तिचे 

जवळपास ५ प्रयोग दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी झाले. या नाटकात मी व माझ्या भावाने विशेष

भूमिका केल्या होत्या. खरं तर आमच्या साठीच तिने त्या नाटिकेची रचना केली होती. आम्हाला 

दोघानाही आई कडून सुरेल गळ्याचा वारसा मिळालाय. आमचे हे गुण पुढे यावेत म्हणूनच तिने 

संगीत नाटकातील पदांवर आधारित असे हे नाटक लिहिले, ज्यात आम्हाला सुंदर पदे गायची संधी 

मिळाली. 

माझ्यासाठी नृत्यावर आधारित असे कार्यक्रम हि तिने बसवले.


ती स्वतः उत्कृष्ट गायिका असल्याने नाट्य संगीतावर आधारित असे ही ती कार्यक्रम बसवत असे. 

असाच एक स्मरणात राहिलेला कार्यक्रम म्हणजे मा. बाल गन्धर्वाना वाहिलेली श्रद्धांजली. या 

कार्यक्रमात बाल गंधर्वांची नाट्य गीते त्यांच्या वेगवेगळ्या वयातील रूपातून प्रस्तुत केली गेली. तरुण 

बाल गंधर्वांचे रूप आईने साकारले होते. बाल गंधर्वांच्या सारखे गाणे त्यांच्या सारख्या लकबी या 

सर्वांचे तिने हुबेहूब सादरीकरण केले होते व त्याचे खूप कौतुक ही झाले. मी तेव्हा खूप लहान होते 

पण तिच्याबद्दल च्या अभिमानाने माझे मन भरून गेलेले आज ही मला आठवते. याशिवाय दिल्लीत 

असताना धुम्मस ”, “ घेतलं  शिंगावर ”, “सम्भूसांच्या चाळीत आणि दिनूच्या सासूबाई राधाबाई” 

अशा अनेक नाटकातून तिने प्रमुख भूमिका केल्या .

या सर्व नाटकांच्या तालमींना आम्ही तिच्याबरोबर जात असू. त्यामुळे त्या तालमीत तिला आईच्या 
भूमिकेतून नाटकातील भूमिकेत शिरताना बघणे फार मजेशीर वाटे. दिनूच्या सासूबाई राधाबाई या नाटकात आईने सासूची भूमिका केली होती. त्याकरता ती कुणाचा तरी मोठ्या नंबर चा चष्मा घालत असे. त्या नंबर पायी तिला नीट दिसत नसे आणि अनेक विनोद घडत असत. आम्ही दोघे तेव्हा शाळेत होतो व आमच्या बारीक बारीक खोड्या चालू असत. पण त्या तालमी चालू असतानाही आईच्या ते बरोबर लक्षात येई आणि मग घरी आल्यावर आम्हाला चांगला प्रसाद मिळे.


एकदा आमच्या शाळेतील झोपाळ्यावरून मी पडले. पाय खूप सुजला . मला चालता येईना. आईने 

मुरगळला असेल असे समजून घरीच मालिश वगेरे केले. २,३ दिवसानंतरही मी चालायचा प्रयत्न हि

करत नाही म्हंटल्यावर तिने मला सक्तीने चालावले. मी तिचे फटके सुद्धा खाल्ले.. पण माझा पाय 

काही चालेना. एक आठवडा असाच, तिचे ओरडणे व माझी रडारड यात गेला. मग मात्र तिने मला 

डॉक्टर कडे नेले. एक्सरे काढल्यावर कळले कि पायाचे हाड मोडले आहे. ते ही २ ठिकाणी. त्यात 

आम्ही त्या पायावर जोर दिल्याने ते जागचे हलले होते. मग कायपाय प्लास्टर मध्ये घालून मला 

घरी आणलं. पण आईने मात्र ते फारच मनाला लावून घेतले.... आणि मग मात्र माझे खूप लाड 

झाले..... अशी ती करारी ही होती. आणि तितकीच हळवी देखील.

पुढे दिल्ली सोडून कल्याणात स्थाईक झाल्यावर आईने कल्याण गायन समाज या संगीत आणि 

नृत्य संस्थेची धुरा सांभाळली व तिथेही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. संगीत विद्यालयाची प्रमुख या  नात्याने तिने संस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणला.कांचनमृगया सारखी नृत्यनाटिका तर राणी रुसली राजावर आणि लग्नाला चला तुम्ही ”  सारख्या वगाचे तिने लेखन,  दिग्दर्शन व 
निर्मिती केली.

याचबरोबर अंधायुग या नाटकातील तिने साकारलेल्या गांधारीच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले.

 १९८० साली कल्याण नगरपालिकेने कल्याण गौरवपुरस्काराने तिला सम्मानित केले .

तिची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी म्हणजे मा.श्रीराम लागू यांच्या विष्णुगुप्त चाणक्य ” 

या नाटकाचे तिनॆ costume designing  केले होते. 

याचबरोबर दूरदर्शन वर अनेक कार्यक्रमात तिचा सहभाग होता. विशेष करून दिल्ली दूरदर्शन वर श्रीमती सई परांजपे यांच्या अनेक कार्यक्रमात तिचा सहभाग असे. 

पुढे १९९६ साली  तिने वसुंधरा ही नृत्य नाटिका लिहिली. या नाटिकेतील गाण्यांचे पार्श्व संगीतासह 

व्यावसायिक स्तरावर ध्वनीमुद्रण ही केले. या नाटिकेचे लेखन जेव्हा ती करत होती तेव्हा तिला 

सुचलेले काव्य, एखादे कडवे ती मला फोन वरून ऐकवी. तिने तिच्या या काव्याला स्वतःच चाली 

लावल्या होत्या. त्याही ती मला ऐकवत असे. अशा प्रकारे या नाटीकेच्या निर्मितीची मी सुरुवातीपासून साक्षी होते. आईचे सर्व भाव हिंदोळे मी तिच्याबरोबरच अनुभवले होते. त्या निर्मिती प्रक्रियेतील तिचा आनंद मी पाहिला होता. ही नाटिका अमेरीकेच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना डॉ.  मीना नेरुरकर यांनी अमेरिकेत व भारतात सादर केली. या नृत्य नाट्याचे चतुरंग तर्फे हिंदी प्रयोग देखील झाले . 

कुसुमाग्रजांच्या  पृथ्वीचे गीत या कवितेवरून प्रेरित ही नाटिका आईचे जणू हृदयातून निघालेले 

मनोगत होते..

या नृत्य नाटीकेचा पहिला प्रयोग १९९७ साली अमेरिकेत Boston  येथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 

अधिवेशनात झाला. डॉ. मीना नेरुरकर यांनी तो सादर केला होता . आई बरोबर मी हि त्यावेळेस 

तिथे गेले होते. प्रयोग सुरु झाल्यावर आनंदातिशयाने आम्ही अत्यंत भावूक झालो होतो. आम्ही दोघींनी तो प्रयोग एकमेकीना मिठी मारून साश्रू डोळ्यांनी पाहिला ... प्रयोगाच्या अखेरीस आईला लेखिका म्हणून रंगमंचावर बोलावून तिचा सत्कार करण्यात आला तो प्रसंग मी कधीही विसरणार नाही. तिला मिळालेल्या मान साम्मानाने मला भरून आले होते. आजही तो प्रसंग आठवला कि माझे डोळे भरून येतात. एवढ्या मोठ्या प्रतिभावान आईची मी लेक असल्याचा मला किती अभिमान वाटला हे शब्दात सांगणे शक्य नाही. माझी ती कुवत नाही.

१०० हून अधिक प्रयोग झालेल्या या नृत्यनाटिकेने  तिला याही क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून दिले. 

या व्यतिरिक्त विविध वर्तमान पत्रातून,  मासिकातून अनेक कथा, ललित लेख, कविता व स्फुट लेखन तिने केले .... या लेखांचा संग्रह,  तिच्या “palette ” या पुस्तकाच्या रूपाने  तिच्या पंचाहत्तराव्या वाढदिवशी प्रकाशित करण्यात आला.... 

सुप्रसिद्ध चित्रकार केतकरांची कन्या होती ती आणि या सर्व कलांआधी चित्रकला तर तिचा जीव कि 

प्राण. दिल्लीतील आमच्या शाळेत तिने चित्रकला शिक्षिकेचे कार्य केले पण त्याच बरोबर ती घरी 

painting चे क्लास घेत असे व वैयक्तिकरित्या चित्रांचे प्रदर्शनही भरवत असे. दिल्लीच्या अशोक 

होटल , ललित कला च्या श्रीधरांनी कला दालनात तिची अनेक प्रदर्शन झाली आहेत. तसेच मुंबईत 

ताज आर्ट गॅलरी  आणि नेहरू सेंटर येथे तिची नेहमी प्रदर्शनं भरत .

१९७२ साली कोल्ड सिरॅमिक चा तिने लावलेला शोध हा तिच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरावा 

....पेंटिंग साठी पौलिएस्टर रेझीनचा वापर करून पारदर्शक पेंटिंग करणारी ती पहिली कलावंत ठरली. 

या माध्यमाचा प्रयोग शिल्प कलेत केला जातो . माझ्या वडिलांना आईने घरी शिल्पाच्या संदर्भात या 

माध्यमात प्रयोग करताना पहिले आणि तिने याचा उपयोग तिच्या चित्रांत केला. हा कलाविश्वातील 

एक अभिनव प्रयोग ठरला. तिची चित्रं मोझेक असल्याप्रमाणे भासू लागली. त्यांना काचे सारखी 

पारदर्शकता मिळाली. त्यांना त्रिमितीचा गुण लाभला आणि तिची चित्र जणू जिवंत झाली . तिने 

निवडलेली रंग संगती ही इतकी प्रभावी व तेजस्वी असे कि बघणारा त्या चित्रांच्या प्रेमात पडत असे.....

तिच्या या चित्रांना एक वेगळीच पारदर्शिता असे. सिरामिक टाईल प्रमाणे ही चित्र दिसत पण 

सिरामिक प्रमाणे वजन दार नसून कॅनवासवर केल्यामुळे अतिशय हलकी अशी ती चित्रं असत. हे 

मिश्रण काही सेकन्दातच थिजते त्यामुळे अतिशय वेगाने चित्र पूर्ण करावे लागते .पुन्हा या मिश्रणाचे 

ओघळ येउ नये म्हणून जमिनीवर कॅनवास ठेवून त्यावर ओणवी होऊन आई पेंटिंग करत असे. एका 

वेळी अनेक चित्रे ती घडवत असे. तिला पेंटिंग करताना बघणे हा एक विलक्षण अनुभव असे. 

कॅनवास वर ती फारच कमी रेषात स्केच करून घेई आणि मग त्यात , कॅनवासवरील न दिसणाऱ्या 

चित्रात ती जेव्हा रंग भरे तेव्हा जादू झाल्याप्रमाणे चित्र आकार घेई. तिच्या चित्रांची रंगसंगती तिच्या 

डोक्यात तयार असे. माझे काम तिला पटापट तिचे ब्रुश धुवून देण्याचे असे . रेझिन मध्ये चित्रे 

रंगवताना हातात हातमोजे घालणे गरजेचे असे. त्यामुळे मला ती मदतीला घेई. पण असे ओणवे 

होऊन चित्र रंगवताना या रसायनांचे विषारू वास तीच्या नाकात जात. नाकावर मास्क घालण्याचे ती 

टाळत असे पण पुढे याचा तिला खूप त्रास होऊ लागला. तिच्या श्वसन क्रियेवर याचे परिणाम दिसून 

आले. तिला दम्याचा त्रास सुरु झाला.

तिची चित्र राजस्थान जीवनशैली वर आधारित असत. मुळात तिला राजस्थानी वेशभूषा, त्यांचे दागिने

उंट,  वाळवंट या सर्वांचे विशेष आकर्षण होते. तिच्या चित्रांतील स्त्रिया सुंदर, बांधेसूद असत ...अगदी

तिच्यासारख्या ... त्यांच्या पोझेस ही अतिशय आकर्षक असत....मेंदी काढणारी....कमरेवर, डोक्यावर 

घडा घेऊन पाण्याला जाणारी,  भरतकाम करणारी, मिरच्या वाळत घालणारी, काही नाही तर नुसतीच 

आळसावलेली अशी स्त्री तिच्या चित्रांचा विषय असे.चित्रांकरता विषय-संशोधनार्थ दिल्ली हून फार दूर 

नसलेल्या जयपूरला आम्ही आईबरोबर जात असू. दिवसभर गल्ल्या, बोळांतून हिंडून आई तेथील 

लोकांचे निरीक्षण करी ,  त्यांची स्केचेस करी आणि मग घरी आल्यावर चित्र काढी .आणि मग अशी 

चित्र निर्माण होत कि त्या चित्रांकडे मी पहातच राही

तिच्या या चित्रांचे अनेक पुरस्कर्ते होते.. आईचे पेंटिंग संग्रही असणारे लोक आम्हाला आईचे त्यांच्याकडील चित्र कसे छान आहे व घरी आलेल्या पाहुण्यांना ते किती आवडते हे आवर्जून सांगतात.

आमच्या भाऊंनी लॉर्ड माउंट बॅटन  आणि प्रिन्स फिलीप यांचे शिल्प केले तेव्हा त्यांच्या जोडीने आई 

गेली होती व सर्व प्रकारे त्यांच्या कामात तिनेच त्यांचे सहाय्य केले. पंडित नेहरू, वसंतराव साठे

अप्पासाहेब पंत,  यशवंतराव चव्हाण यांना भेटण्याचे सौभाग्य तिला लाभले. पंडित भीमसेन जोशी 

यांच्या सारख्या दिग्गज व्यक्तींशी तिचा परीचय होता इतकेच नव्हे तर बाबासाहेब पुरंदरे, पंडित कुमार गंधर्व, मा.पु.ल.देशपांडे, श्रीमती सुनीताबाई देशपांडे यांच्याशी विशेष ऋणानुबंध ही होता.

पोर्ट्रेट हा तिचा खास आवडीचा विषय....श्री. सी. डी. देशमुख, श्री . स. का. पाटील,  श्रीयुत यशवंतराव 

चव्हाण, श्रीमती वेणूताई यशवंतराव चव्हाण, श्री. श्री.ना.पेंडसे, श्री.श्रीराम लागू ,जळगावचे श्री भंवरलाल

जैन, मुंबईचे श्री देवधर  अशा अनेक दिग्गजांचे पोर्ट्रेट्स  तिने केले.

तिने केलेले (आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सर न्यायाधीश) कै. नागेंद्र सिंगजी यांचे भव्य व्यक्तिचित्र हेग इथे लागले आहे. 

या शिवाय पंडित भास्करबुवा बखले यांचे व्यक्तिचित्र कल्याण गायन समाजात दिमाखात विराजमान आहे. दिल्लीत परिचय केंद्र येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पोर्ट्रेट लागले आहे. या शिवाय तिने केलेली श्री सुधीर फडके, बडोद्याचे श्री माधव आचवल यांची पोर्ट्रेट्स  तर अतिशय जिवंत झालेली आहेत.

ती सतत कोणत्या ना कोणत्या व्यापात बुडालेली असे ... 

ती एक घरंदाज सून होती जिचे तिच्या घरावर अतिशय प्रेम होते. कल्याणच्या साठे वाड्यात १९५६ साली लग्न होऊन शिरली ती वाड्याचीच होऊन गेली. जगभर हिंडून आलेली माझी आई वाड्यात सर्व तर्हेचे कुळाचार पाळत असे. वाड्यातील ५ दिवसांचा गणपती असो नाहीतर लग्न कार्य .....आईचा सगळ्या बाबतीत पुढाकार असे. तिला स्वैपाकाची आवड होती , शिवणाची आवड होती... 

तिची स्मरणशक्ती फार तीक्ष्ण होती.... जुनी जुनी गाणी, श्लोक, स्तोत्र तिला तोंडपाठ होती.

अशी कोणतीच गोष्ट मला आठवत नाही जी तिच्या आकलन शक्तीच्या पलीकडे होती...

भाऊंच्या व्वसायाची गरज म्हणून ती टायपिंग शिकली होती आणि आजच्या कॉम्प्यूटरच्या युगात तिने ईमेल करायला ही शिकून घेतले होते.

भारतात व भारताबाहेर ५५ हून अधिक चित्र प्रदर्शने तिच्या नावावर आहेत. मुंबई , दिल्ली, चेन्नई, लंडन, मास्को, न्यू यॉर्क, वॉशिंग्टन, बाल्टिमोर, ब्रुसेल्स, डेट्रोईट, हौलंड, ऍटलांटा, शिकागो, ह्युस्टन, बौस्टन, अशी अनेक ठिकाणी तिची झालेली प्रदर्शन. 

तिचा सतत मला लाभलेला सहवास आणि मार्गदर्शन ......खरच किती माझे भाग्य थोर......

या प्रदर्शनानिमित्ताने तिचा असंख्य व्यक्तींशी परिचय झाला व उत्तरोत्तर तो तिने दृढ केला . तिच्याबरोबर २ वेळा मला अमेरिकेस जाण्याचे सौभाग्य मिळाले आणि या प्रवासात मला एका वेगळ्याच स्त्रीचे दर्शन झाले. मला माहित असलेल्या आईच्या प्रतिमेस अजूनही उजळून टाकणाऱ्या तिच्या एका वेगळ्याच रूपाचे मला दर्शन झाले. ती व्यक्ती रोज मला घरात भेटणारी माझी फक्त प्रेमळ आई नव्हती तर ती जगात पूर्ण आत्मविश्वासाने वावरणारी एक कर्तृत्ववान स्त्री होती. 

तिची ही २ रूपे खरच विस्मयात टाकणारी होती . खरोखर ती एक अफलातून स्त्री होती . संकटाना न घाबरणारी , कोणत्याही परिस्थितीत हताश ना होणारी.

ती प्रेमळ होती तशीच ती अतिशय शिस्तप्रिय होती. कोणत्याही प्रकारचे फाजील लाड आमचे तिने केले नाहीत. रोजच्या जेवणात गोडा बरोबर कडू कारले हि ती खायला लावायची. तिने आमच्यावर अभ्यासाची कधी सक्ती केली नाही पण अभ्यास करून काय त्या उनाडक्या करा असे ती म्हणे
ती आमची आई होती ....आमचे हट्ट पुरवणारी, वेळ प्रसंगी दटावणारी,  आम्हावर संस्कार घडवणारी अतिशय सुगरण, उत्तम गृहिणी, उत्तम पत्नी, प्रेमळ आजी आणि शिवाय तिच्या इतर भूमिका मावशी, काकू,  मामी,  आत्या आणि सून, जाऊ उत्तम रित्या पार पाडणारी अशी ती एक आदर्श स्त्री होती. 

आम्हा मायलेकीत एक विशेष बंध होता. आम्ही एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी होतो. माझ्या प्रत्येक कलाकृतीत तिचे मार्गदर्शन मला लाभले. माझ्या चित्रातील विषय, त्यांची मांडणी, व त्यांचे सादरीकरण सर्वच बाबतीत मी तिचा सल्ला घेत असे. नवे काही लिहिले तर तिला कधी वाचायला देते असे मला होई. माझे शिक्षण दिल्लीत झाल्याने माझ्या मराठी लेखनात अडलेला शब्द तीच मला सांगे. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत ही मी तिचा सल्ला घेत असे. माझी आई, माझी मैत्रीण, माझी सखी होती ती.

अतिशय दुख होत आहे आज  मला तिला होती असे म्हणताना. 

२००७ साली कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी तिने झुंज दिली आणि त्यातून ती बाहेरही पडली खरी पण ती आमची पूर्वीची आई नव्हती ...कॅन्सर च्या उपचाराच्या सोपस्काराने तिला फार दमवले.... प्रियजनाच्या प्रेमाखातर तिने सर्व त्रास सोसला. 

तरी त्या अशक्त अवस्थेत ही तिने चित्र रंगवली , पोर्ट्रेट्स  केली. वाड्यातल्या सर्व कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला........माझ्या मुलाच्या लग्नात नवरदेवाची आजी म्हणून मिरवली हे मी माझे व माझ्या मुलाचे मोठेच भाग्य समजते.

हे सगळं जरी खरं असलं तरी २३ ऑगस्ट २०१४  रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी तिने ह्या जगाचा निरोप घेतला हे ही एक कठोर सत्य आहे. कुणाच्या ध्यानी मनी नसताना,  कुणाला कसला ही त्रास होऊ न देण्याची खबरदारी घेऊन,  शांतपणे,  मला व माझ्या भावाला पोरकं करून ती निघून गेली ... पुन्हा कधी ही न भेटण्या, दिसण्या इतकी लांब गेली. ती गेली हे वाक्यच मला चुकीचे वाटते ...  खर तर ती आहे... इथेच कुठे तरी. आमच्या वर तिचे लक्ष असणार,  ही खात्री आहे मला.

तिने दिलेल्या तिच्या कला गुणांच्या वारशाचे ऋण मला कसे फेडता येईल हा प्रश्न मला पडतो. 

अशा या माझ्या कलावती आईला माझा प्रणाम !!

आज ही माझ्या फोन मध्ये तिचा नंबर तिच्या फोटो सकट सेव्ड आहे ... वाटत तिला फोन केला कि तीच फोन घेईल आणि मला तिचा चिरपरिचित गोड प्रेमळ आवाज ऐकू येईल.......  




अल्पना लेले

No comments:

Post a Comment